मुंबई – लोकसभा जागावाटपात सहमती न झाल्यानं हरियाणात सत्तेत असलेलं भाजपा- जेजेपी सरकार कोसळलंय. भाजपानं मंगळवारी युती तोडून अपक्षांच्या मदतीनं नवं सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहेत. भाजपासोबत सत्तेत गेलेल्यांनी यातून बोध घ्यावा असं ट्विट शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलंय.
काय म्हणालेत रोहित पवार?
हरियाणामध्ये दोन जागांचा आग्रह करणाऱ्या ‘मित्राला’ भाजपने शिकवलेला धडा हा महाराष्ट्रातल्या मित्रांसाठी संदेश तर आहेच शिवाय अल्टिमेटम देखील आहे. हरियाणातील राजकीय घडामोड बघता विकासाच्या आणि विचारधारेच्या नावाखाली भाजपसोबत जाणाऱ्या महाराष्ट्रातील मित्रपक्षांच्या नेत्यांना ‘स्वाभिमान गहाण टाकला की गुलामी पत्करावीच लागते’ याचा प्रत्यय आलाच असेल.
उद्या लोकसभेसाठी राज्यात सर्वच मित्रपक्षांना कमळाच्या चिन्हावर लढावे लागले तर आश्चर्य वाटू नये. असो स्वतःच्या अडचणींमुळे नेते हतबल असले तरी तिकडे गेलेले आमदार मात्र हतबल नाहीत, ते नक्कीच योग्य तो बोध घेऊन सुयोग्य तो निर्णय लवकरच घेतील.
गेलेल्या आमदारांना रोहित पवारांची साद
स्वाभिमान गहाण टाकला की गुलामी पत्करावीच लागते, असं सांगतानाच नेत्यांना अडचण असेल मात्र आमदारांनी बोध घ्यावा, असं रोहित पवार म्हणालेत. राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पुन्हा परत फिरण्याचं आवाहनच त्यांनी यानिमित्तानं केलेलं दिसतंय.
हरियाणात काय घडतंय?
जागावाटपावरुन भाजपा आणि जननायक जनता पक्ष म्हणजेच जेजेपीची युती तुटल्यानंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला. त्यानतर भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नायब सिंह सैनी यांची गटनेतेपदी निवड करण्यात ाली. त्यानंतर त्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला.
कुरुक्षेत्रचे भाजपा खासदार नायब सैनी यांना राज्यपाल बंडारु दत्तात्रय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यांच्यासोबत मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला. त्यानंतर आज विधानभवनात सैनी सरकारच्या विश्वासमत दर्शक ठरावावर मतदान होणार आहे.