महाराष्ट्र ताज्या बातम्या

विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात वाघ अभयारण्य, इतरत्र बिबट अभयारण्य; मृतांच्या कुटुंबीयांना नोकरी देणार

Maharashtra Forest Minister Ganesh Naik addressing the Legislative Assembly while responding to a discussion on tiger attacks, leopard conservation and wildlife sanctuaries.

मुंबई : राज्यात वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबा धर्तीवर वाघ अभयारण्य उभारण्यात येईल, तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये बिबट्यांसाठी स्वतंत्र अभयारण्ये निर्माण केली जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा नियम १०५ अंतर्गत लक्षवेधी सूचना मांडताना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलांवर झालेल्या वाघांच्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित केला. या हल्ल्यांमध्ये चार महिलांचा मृत्यू झाल्याचे सांगत त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि मानव-वन्यजीव संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली.

काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार विजय वडेट्टीवार यांनीही आपल्या मतदारसंघातील एका कुटुंबातील चार सदस्यांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा उल्लेख केला. अशा घटनांमुळे अनाथ झालेल्या लहान मुलांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारकडून ठोस उपाययोजनांची मागणी केली.

उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, राज्यात वाघांची संख्या गेल्या काही वर्षांत सुमारे चारपटीने वाढली आहे. वन विभागाकडून सकाळी सातपूर्वी आणि सायंकाळी सातनंतर जंगलात न जाण्याच्या सूचना दिल्या जातात, मात्र अनेक नागरिक त्या दुर्लक्षित करतात.

“वाघ आणि बिबट्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित वावरता यावा यासाठी ज्या भागांत त्यांची संख्या जास्त आहे, तेथून नियोजनबद्ध पद्धतीने इतर योग्य भागांमध्ये अभयारण्ये विकसित केली जातील. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात वाघ अभयारण्य आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये बिबट्यांसाठी अभयारण्य उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” असे नाईक यांनी सांगितले.

वनमंत्र्यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा करताना सांगितले की, वाघ किंवा बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात