X : @therajkaran
मुंबई: अमेरिका आणि इटलीचे अध्यक्ष आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे कौतुक करतात. मोदींमुळेच जगात भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे. २०३० मध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर येईल. भाजप (BJP) हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. आमचे लोकसभेत ३०३ खासदार आहेत. या निवडणुकीनंतर आम्ही चारशे पार पोहचू, असा आत्मविश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज येथे व्यक्त केला. रामलीला मैदानावर कॉंग्रेससह इंडिजच्या (I.N.D.I.A. alliance) पक्षनेत्यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना पंतप्रधान मोदींवर टीका करणारेच तडीपार होतील, असा इशारा राणे यांनी दिला.
भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना लक्ष्य केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना वचन दिले, म्हणून गप्प आहोत. उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या फक्त पाच खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर शुन्य असेल. सध्या पंधरा आमदार आहेत, त्यातील फक्त पाच राहातील, असा दावा राणे यांनी केला. ते पुढे म्हणाले, उद्धव यांच्याकडे मर्सिडीजसारख्या गाड्या कोठून येतात? याची चौकशी होऊ शकते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यासारखी वेळ येऊ शकते, असा इशाराही राणे यांनी दिला.
सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा (Sindhudurg – Ratnagiri Lok Sabha constituency) मतदारसंघ भाजपचाच आहे, तिथे भाजपचाच उमेदवार लढणार. कोणीही लुडबुड करू नये. द्याल ती जबाबदारी मी पार पाडेल, असा शब्द भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा (J P Nadda) यांना दिला आहे. उद्यापर्यंत तिथे उमेदवारीबाबत अंतिम निर्णय होईल, असेही नारायण राणे यावेळी म्हणाले. काँग्रेसचा सध्या लोकसभेत विरोधी पक्षनेताही नाही. निवडणुकीनंतर त्यांची संख्या ३० ते ३५ पुढे जाणार नाही, असे भाकीत त्यांनी वर्तवले.