विदर्भ दौऱ्याला सुरुवात; नागपुरात लवकरच भव्य शिवसैनिक मेळाव्याची घोषणा
नागपूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर जोरदार टीका केली. “शिवसेना ही शिवसैनिकांमुळे आहे आणि शिवसैनिकांमुळेच कायम राहणार आहे. कुणाच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपवणे कोणालाही शक्य नाही. शिवसेनेच्या मुळावर उठणाऱ्यांना शिवसैनिक कधीच माफ करणार नाहीत,” असे ते म्हणाले.
शिवसेनेतील फुटीनंतर विदर्भातील पक्षसंघटना बळकट करण्याच्या उद्देशाने उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. यवतमाळ दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी त्यांनी नागपूर विमानतळावर कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
नागपुरात भव्य मेळाव्याची घोषणा
यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुढील महिन्यात नागपुरात शिवसैनिकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
“आज मी यवतमाळला जात आहे. मात्र लवकरच पुन्हा नागपुरात येणार असून पुढील महिन्यात येथे शिवसैनिकांचा मोठा मेळावा घेऊ,” असे सांगत त्यांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आवाहन केले.
सरकारवर टीका
राज्य सरकारवर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले की, काही वर्षांपूर्वी नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर शिवसेनेची ऐतिहासिक सभा झाली होती आणि त्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता.
“सरकारने नागपुरात तेवढे मोठे मैदान शिल्लक ठेवले असेल, तर त्याच मैदानावर पुन्हा जाहीर सभा घेऊ,” असा टोला त्यांनी लगावला.
विदर्भावर पक्षाचे लक्ष
लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत विदर्भातील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याकडे पक्षाच्या आगामी राजकीय रणनीतीचा भाग म्हणून पाहिले जात आहे.

