मुंबई : निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाच्या प्रचारगीतावर आक्षेप घेण्यात आला असून यातील ‘हिंदू’ आणि ‘भवानी’ हे दोन शब्द काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचारगीतातील एकही शब्द हटवणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.
शिवसेना फुटीनंतर अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मशाल हे चिन्ह देण्यात आलं होते. लोकसभा निवडणुकीसाठी या मशाल चिन्हाभोवती एक प्रचारगीत शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या प्रचारगीतात ‘हिंदू हा तुझा धर्म, जाणून घे हेच मर्म’ अशी ओळ आहे. यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाने हिंदू शब्द काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, याशिवाय या गीतात ‘जय भवानी, जय शिवाजी’ या जयघोषातील भवानी शब्दावरही निवडणूक आयोगाकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
रविवारी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला. भाजपच्या अनेक नेत्यांकडून हिंदूत्वच्या मुद्द्यावरुन मतं मागितली जात आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जय बजरंग बली बोला आणि बटण दाबा असं सांगितलं होतं, तर गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशातील सभेदरम्यान अयोध्येत मोफत दर्शन हवं असेल तर भाजपला निवडून देण्याचं विधान केलं होतं. त्यामुळे आमच्यावर कारवाई करण्यापूर्वी निवडणूक आयोगाने मोदी आणि शहा यांच्यावर कारवाई करावी असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावुन सांगितलं.
कारवाई करून दाखवा…
तुमच्या सातशे पिढ्या उतरल्या तरी आमच्या हृदयातील भवानी आणि शिवाजी काढू शकणार नाही, आम्ही आमच्या कुलदैवतेचा गजर करतोय. यापुढेही आम्ही जय भवानी, जय शिवाजी म्हणणार, हिंमत असेल तर माझ्यावर कारवाई करून दाखवा.