मुंबई- उद्धव ठाकरेंनी केलेल्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या गौप्यस्फोटाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री काय, मंत्रीसुद्धा केलं नसतं, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय. आदित्य ठाकरे यांनी कोणती निवडणूक लढवली, त्यांच्याकडे काय अनुभव आहे, त्यांची लायकी काय आहे, या शब्दांत बावनकुळेंनी संताप व्यक्त केलेला आहे. राज्यातील नालायक माणसांची स्पर्धा गेतली तर उद्धव ठाकरे हे महानालायक ठरतील असंही बावनकुळे म्हणाले आहेत.
काय म्हणालेत बावनकुळे?
उद्धव ठाकरे यांचं पुत्रप्रेम आहे. त्यांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं आहे. त्यासाठी ते त्यांच्या मनातलं देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी घालत आहेत, अशी टीका बावनकुळेंनी केलीय. चोरुन मुख्यमंत्रीपद मिळवलेले ठाकरे हे निष्क्रिय राहिले होते. त्यामुळं सांगणाऱ्यासारखं काही नसल्यानं ते अशी वक्तव्य करत असल्याची टीका त्यांनी केलीय. उद्धव ठाकरे मनोरुग्ण झाले आहेत, त्यांना डॉक्टरांना दाखवण्याची गरज असल्याची टीकाही त्यांनी केलीय.
एक खोटं बोलल्यामुळे शंभर खोटं बोलावं लागतंय-आशिष शेलार
उध्दव ठाकरे हे एक खोटं बोलल्यामुळे त्यांना आता शंभर वेळा खोटं बोलावं लागतं आहे, असा टोला मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी लगावला. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता अशा आशयाचं विधान उध्दव ठाकरे यांनी केलं आहे. त्यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार शेलार म्हणाले की, गेले दोन चार वर्षे उध्दवजी म्हणत होते की, त्यांच्यात आणि अमित शाहा यांच्यात चर्चा झाली. अमित शाहा यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला होता, असा दावा त्यांनी केला होता. आता त्यांनी दुसरा दावा केला आहे की, याबाबत देवेंद्रजींशी चर्चा झाली होती. वर्षानुवर्षे दावे ते बदलत आहेत.
अमित शाहा यांनी आधीच दावा फेटाळलाय-शेलार
तशी कोणतीही चर्चा झाली नाही हे अमितभाई शाहा यांनी स्पष्ट केलेले आहे, त्यामुळे उध्दव ठाकरे यांचं हे खोटं विधान ना जनतेला पटलंय, ना शिवसैनिकांना पटलय. त्याचा पुरावाही त्यांच्याकडे नाही, त्यामुळं आता ते आणखी एक खोटे बोलत आहेत. माझी आई मला सांगत असे की, खोटे कधी बोलू नको, एक खोटे बोलले की पुढे शंभर खोटे बोलावे लागते. उध्दव ठाकरे आपले एक खोटे पचवण्यासाठी आणखी एकदा खोटे बोलले आहेत. आणखी त्यांना कितीवेळा खोटे बोलावे लागणार आहे असा प्रश्न आहे. दुसरा महत्वाचा मुददा म्हणजे केंद्रीय मंत्री अमितभाई शाह यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले होते की, पुत्र प्रेमातून शिवसेनेत फुटली. आज याला पुष्टी मिळाली असून शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदी बसवायचे आहे असे उध्दव ठाकरे बोलत जरी असले तरी प्रत्यक्षात आदित्यलाच मुख्यमंत्री करायचे पोटात होते, त्यांच्या मनातील चांदणे आता समोर आले आहे, असेही आमदार ॲड आशिष शेलार म्हणाले.