नाशिक : माकपने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाबद्दलची आपली भूमिका बदलल्याचं चित्र आहे. ऐनवेळी माकपने शक्तिप्रदर्शन करीत दिंडोरीतून स्वत: चा उमेदवार उभा करण्याची तयारी दर्शवल्याने महाविकास आघाडीसमोर मोठी पेच निर्माण झाला आहे. आतापर्यंत मार्कवादी कम्युनिस्ट पक्षाकडून महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. या जागेवरुन माकपचे इच्छूक उमेदवार जिवा पांडू गावित यांच्यासोबत शरद पवारांची बैठक झाली होती. यामध्ये पवारांनी लोकसभेत मदत करण्याचं आवाहन केलं होतं. याची परतफेड विधानसभेत करण्यात येईल असंही सांगण्यात आल्याची माहिती आहे. त्यावेळी माकपने सर्व बाबी मान्य करीत दिंडोरी लोकसभेतून मविआला पाठिंबा दर्शवला होता.
मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येताच एका मोठ्या सभेत माकपने आपली भूमिका बदलली आणि ही जागा माकपला द्यावी अन्यथा पक्षाच्या चिन्हावर उमेदवार देण्याचा पवित्रा जाहीर केल्यानं मविआसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. माकपने दिंडोकी येथे शेतकरी, कामगार आणि शेतमजुरांच्या जाहीर सभेतून या जागेवर हक्क सांगितला आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, मविआचे भास्कर भगरे आणि वंचितकडून महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे हे तिघे मैदानात आहे. दरम्यान माकपचे आमदार जिवा पांडू गावित सातवेळा विधानसभ निवडणुकीत निवडून आले आहेत. तर या जागेत माकपची सव्वा लाख मतं आहेत.