X: @therajkaran
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी मुंबईतील (Mumbai) सहा मतदारसंघांवर सर्वच पक्षश्रेष्ठींचा डोळा आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे लोकसभेच्या उत्तर मुंबई मतदारसंघात मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, माजी आमदार विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा आहे.
विनोद घोसाळकर हा शिवसेनेचा जुना चेहरा असून त्यांना उमेदवारी दिल्यास या मतदारसंघात भाजपच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून, महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. मात्र अद्याप राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. परंतू, संभाव्य उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दौरा केली. त्यावेळी विद्यमान खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांना पुन्हा दिल्लीत पाठवायचं आहे, असे वक्तव्य केले. त्यामुळे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
अशात, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना ठाकरे गटाकडे आल्यानंतर, उमेदवार म्हणून विनोद घोसाळकर यांच्या नावाची चर्चा आहे. पदाधिकाऱ्यांकडून या लोकसभा मतदारसंघातून विनोद घोसाळकर यांच्या नावाला पसंती आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांकडूनही सोशल मीडियावर प्रचार केला जातो आहे. मात्र अद्याप शिवसेना ठाकरे गटाकडून या लोकसभा मतदारसंघासाठी कोणाचीही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. घोसाळकरांना सुद्धा तशा प्रकारचे आदेश शिवसेना ठाकरे गटाकडून मिळालेले नसल्याची माहिती आहे.
भाजपने (BJP) जाहीर केलेल्या दुसऱ्या उमेदवार यादीत उत्तर मुंबई मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याआधी उद्यान सम्राट म्हणून प्रसिद्ध असलेले गोपाळ शेट्टी या मतदारसंघात खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र लोकसभा निवडणूक 2024 साठी गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी नाकारत पियूष गोयल यांना देण्यात आली आहे. अशातच ठाकरेंनीही या मतदारसंघात तयारी सुरू केली असून, जुना चेहरा म्हणजेच विनोद घोसाळकरांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.