मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना जळगावचे विद्यमान खासदार, उत्तर महाराष्ट्रातील भाजपा नेते उन्मेष पाटील (Unmesh Patil )यांनी भाजपला रामराम करत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray )उपस्थितीत मातोश्रीवर शिवबंधन बांधले आहे . त्यांच्यासह पारोळाचे नगराध्यक्ष करण पवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. यावेळी मातोश्री परिसरात एकच जल्लोष करण्यात आला. उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. तसेच सत्ताधारी भाजपच्या विद्यमान खासदाराने महाराष्ट्रात पक्षांतर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.त्यामुळे ठाकरे गटाला आता चांगलेच बळ मिळणार आहे .
ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर उन्मेष पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला माझ्या कामाची किंमत नाही, एका भावाने दगा दिला असला तरी, दुसरा भाऊ शिवसेना माझ्यासोबत आहे, हा मला विश्वास असल्याने आपण शिवसेना ठाकरे गटात सामील होत असल्याचं उन्मेष पाटील यांनी म्हटलं आहे.तसेच राजकारण करत असताना आमदार, खासदार होण्याचं स्वप्न नव्हतं. एका हेतूने काम करत होतो. पण प्रामाणिक कार्यकर्त्याची अवहेलना होत आहे. बदल्याची भावना रुजवली जात असून, ती घातक आहे. आपण या पापाचे वाटेकरी होऊ नये असं ठरवलं. मान सन्मान नको, पण स्वाभिमान जपला जात नसेल तर थांबण्यात अर्थ नाही, अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केली .
त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी प्रतिक्रिया दिली आहे . ते म्हणाले , उन्मेष पाटील निष्ठावंत भाजपा कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. पण निष्ठावंतांच्या नशिबी संघर्ष असतो. त्यांना भाजपात कदर नव्हती आता शिवसेनेत प्रत्येकाला कदर असल्याने ते येथे आले आहेत . त्यांच्या येण्याने उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला बळ मिळेल. संघर्षाच्या काळात त्यांच्यासारखा नेता उद्धव ठाकरेंसह उभा राहिला याबद्दल अभिनंदन करतो,” असं ते म्हणाले .शिवसेनेतील प्रवेशाने जळगावमधील निवडणूक फक्त रंगतदार नाही, तर विजयाकडे घेऊन जाणारी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी उन्मेष पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. मेलच्या माध्यमातून उन्मेष पाटील यांनी त्यांचा लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला. . राजीनामा दिल्यानंतरच उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात आज प्रवेश केला.त्यांच्या प्रवेशाने मातोश्रीवर जल्लोष करण्यात आला आहे .