मुंबई : लोकसभेच्या रणधुमाळीत चर्चेत ठरलेल्या हातकणंगले (Hatkanangale) लोकसभा मतदारसंघांमध्ये अखेर ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे हातकणंगलेची लढत चौरंगी होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर (Satyajit Patil Sarudkar )यांना या मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याआधी या मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेकडून खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane)आणि शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti)हे मैदानात आहेत. याठिकाणी वंचितकडून ही उमेदवार देण्यात आला आहे . त्यात आता ठाकरे गटाची मशाल घेऊन सत्यजित पाटील रिंगणात उतरले आहेत . त्यामुळे या मैदानात बाजी कोण मारणार हे पाहणे देखील जास्त महत्वाचे ठरणार आहे .
याआधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी दोनवेळा मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेत आपल्याला पाठिंबा मागितला होता. मात्र, मशाल चिन्हावर त्यांनी नकार दिल्याने आणि मतदारसंघातून कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर उमेदवार देण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, हातकणंगले मतदारसंघ हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे . त्यामुळे याठिकाणी आम्हीच लढणार . तसेच सांगलीत आम्ही आमचा उमेदवार दिला आहे . तेथेही बाजी आम्हीच मारणार . मतदारसंघातील राजकीय गणिते पाहता आम्हाला कार्यकर्त्यांनी उमेदवार द्यावा अशी मागणी केली होती. दरम्यान राजू शेट्टीनी नकार दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे आता उमेदवार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले .
सध्या शिवसेनेचे धैर्यशील माने हे या मतदारसंघात खासदार आहेत. त्यांना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची उमेदवारी वेटिंगवर होती. मात्र शिवसेनेने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीत धैर्यशील माने यांचं नाव होतं. त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र त्यांच्यावरील नाराजीमुळे उमेदवारीवर आता टांगती तलवार आहे. कारण धैर्यशील माने यांची उमेदवारी बदलून, त्यांच्या जागी त्यांच्या मातोश्री आणि माजी खासदार निवेदिता माने यांना उमेदवारी देण्याच्या हालाचाली सुरु आहेत.