मुंबई
महाविकास आघाडीचं ठरलं असं म्हणत असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. या व्हिडीओत त्यांनी काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेत्यांची युती तोडण्याची भूमिका असल्यास आघाडी कशी होणार? असा सवाल धैर्यवर्धन पुंडकर यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीचा मसुदाच तयार झाला नाही तर पुढची बोलणी होणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
आपण युतीच्या विरोधात आहात का? असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाना पटोले विचारायला हवा. जर नाही, तर प्रमुख पदे युतीच्या विरोधकांना दिली, तर युती होणार कशी? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी मजबूत झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि राहील, असंही पुंडकर यावेळी म्हणाले.
पुंडकर पुढे म्हणाले, २ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ माझ्या नेतृत्वात सहभागी झाले होते. या बैठकीत असं ठरलं की, जागावाटप बोलणी सुरू करण्यापूर्वी तात्विक मुद्द्यांवर एकत्र आलं पाहिजे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मसुदा देण्यात आला. यावर सर्व पक्षांचं एकमत झालं तर तो अंतिम करावा. त्यासाठी प्रत्येक पक्षाने दोन प्रतिनिधी द्यावे आणि त्या प्रतिनिधींनी मसुद्याला अंतिम स्वरुप द्यायचे आणि त्यानंतर जागावाटपाला सुरुवात होईल, असं ठरलं.
काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवली पाहिजे, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांची आहे. याबाबत अनेकदा जाहीरपणे सांगण्यात आलं आहे. नाना पटोले युतीच्या विरोधात आहेत का? असा सवाल काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित करायला हवा. विशेष म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माहितीसाठी हा व्हिडीओ तयार करण्यात आल्याचं पुंडकर यांनी म्हटलं आहे.