X: @therajkaran
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहिले आहे. प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरवर ते पत्र शेअर केले आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) राज्यात काँग्रेसला (Congress) सात मतदारसंघात पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही सांगाल त्या सात जागांवर आम्ही काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा देऊ, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे. मात्र यामुळे उर्वरित 41 जागांबद्दल वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय असणार आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत चार जागांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. त्याला त्यांनी अद्याप हिरवा कंदिल दिलेला नाही. दरम्यान, आज सकाळपासून महाविकास आघाडीने वंचितला आज संध्याकाळपर्यंत निर्णय कळवण्याचा अल्टिमेटम दिल्याच्या बातम्या येत होत्या. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या चर्चा फेटाळल्या आहेत.
वंचित बहुजन आघाडीकडून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छांचाच नाही, तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा हात देणाराही आहे, असेही या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, या प्रस्तावावर काँग्रेस काय प्रतिसाद देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मी तुम्हाला विनंती करतो की, महाविकास आघाडीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी सात मतदारसंघांची नावे मला द्यावीत. तुमच्या पसंतीच्या या सात जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांना आमचा पक्ष पूर्णपणे धोरणात्मक पाठिंबा देईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकरांनी स्वतः एक पत्र ट्विट करुन काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. मात्र उर्वरीत 41 जागांबद्दल वंचितची भूमिका काय असणार आहे, असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे.