X: @therajkaran
गाजावाजा करत अगदी राज ठाकरे यांच्या फोटोला दंडवत घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची राजकीय हुशारी दाखवत , मीडियाला अलर्ट मोडवर ठेवून वसंत मोरे यांनी त्यांचा अपेक्षित राजीनामा दिला. पुणे लोकसभा मतदारसंघातून कुठल्याही पक्षातून निवडणूक लढवायचीच आहे हा एकमेव उद्देश कोणापासूनही न लपवता त्यांनी मनसेला रामराम ठोकला. राजीनामा दिल्याच्या दुसऱ्याच क्षणी विरोधी पक्षांकडून आपली उमेदवारी जाहीर केली जाईल, असा काही त्यांचा समज नसेलही मात्र त्यासाठी आपल्याला पुणे ते मुंबई असा वणवण प्रवास करावा लागेल हा विचार मात्र तात्यांनी केला नसावा.
पुणे मनसेमधील पदाधिकारी आपल्याला एकटे पाडतात, त्यांची मनमानी सुरू आहे, त्यांच्या स्वतःबद्दल आणि मनसे पक्षाबद्दल चुकीची व दिशाभूल करणारी माहिती राज ठाकरे यांना दिली जाते, या सर्व कारणांपासून ते राजसाहेब मला कधीच बोलले नाहीत, पण अमित ठाकरे यांनी माझी कानउघाडणी केली इथपर्यंत सर्व कारणे देत, आपली लोकसभा लढवण्याची उघड इच्छा पूर्ण करण्यासाठी मोरे मनसेच्या बाहेर पडलेच. काहीही झाले तरी निर्णय बदलणार नाही , कुठल्याही पक्षातून अथवा अपक्ष, पण पुणे लोकसभा मतदारसंघात आपण उमेदवार म्हणून असणारच अशी राणा भीमदेवी थाटाची घोषणाही वसंत तात्यांनी राजीनामा देताक्षणी मीडिया समोर केली.
राजकारणाचा एक भाग म्हणून, राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोरेंना भेटायला ज्येष्ठ नेते, आणि मागील निवडणूकीतील काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी थेट त्यांच्या कार्यालयात पोहचले. त्यांनी काँग्रेस प्रवेश करावा अशी ऑफरही जोशींनी त्यांना दिली. मात्र काँग्रेसचे आमदार रवींद्र धनगेकर यांनी या लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे पूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांची आणि काँग्रेसच्या बाकी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची मोरे यांनी मनधरणी करण्यास लगेचच सुरुवात केलेली आहे. काही दिवसांपूर्वी मोरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती, काल परत वसंततात्या पवारांना जाऊन भेटले, पवार गटाचे नेते खासदार अमोल कोल्हे यांची गळाभेटही त्यांनी घेतली. पक्ष कुठलाही असला तरी चालेल पण महाविकास आघाडीतून आपल्याला पुणे लोकसभा लढवायला मिळावी यासाठी त्यांनी पवारांना साकडे घातले आहे. एवढ्यावरच न थांबता पुणे, हवेली, मावळ अशी मजल दरमजल करत मोरेतात्यांनी आज मुंबईत नागू सयाजी वाडी गाठली. इथे त्यांनी शिवसेना उबाठा गटाचे सर्वेसर्वा, आक्रमक नेते, महाविकास आघाडीचे शिल्पकार संजय राऊत यांना भेटून महाविकास आघाडीतून लढण्यासाठीचा कौल मागितला आहे.
पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या चुका दाखवत, थेट अमित ठाकरेंना बोल लावत, पुण्यातून लोकसभा लढवायचीच या एकमात्र कारणास्तव मनसेतून बाहेर पडल्यामुळे, आता लोकसभेसाठी उमेदवारी मिळवणे हा वसंत मोरे यांच्या प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. महाविकास आघाडी त्यांना तिकीट देते की तात्या अपक्ष म्हणून उभे राहण्याची धमक दाखवतात हे काही दिवसातच स्पष्ट होईल.