कोल्हापूर
आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. अजित दादांनी सकाळी तालमीची पाहणी केली. क्रीडा अधिकाऱ्यांना तालमीत नसल्याचं पाहून दादांनी त्यांना फोन करून चांगलाच समाचार घेतला. वेळेवर उपस्थित न राहिल्याने दादांनी त्यांना वेळेची आठवण करून दिली.
अजित पवारांनी गंगावेश तालमीला भेट दिली आणि येथील कुस्तीपट्टूंशी चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालमींना मदत करण्याचं धोरण जाहीर केलं आहे. त्यामुळे तालमींची स्थिती पाहण्यासाठी त्यांनी आज कोल्हापूर गाठलं आणि गंगावेश तालमीला भेट दिली. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांनी याच तालमीतून सराव केला होता. त्यामुळे पैलवान कोणत्या परिस्थितीमध्ये सराव करतात, याचा आढावा घेतला. मात्र यावेळी क्रीडा अधिकारी अनुपस्थितीत होते. त्यामुळे अजित पवारांनी अधिकाऱ्यांना फोन करून त्यांची शाळा घेतली. अजित पवारांनी सकाळी PWD अधिकाऱ्यांचाही समाचार घेतला.
अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्ह्यात दिवसभर विविध कामांचा लोकार्पण सोहळा होईल. त्यासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. शहरातील सेंट्रल जेल शहराबाहेर नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले. त्या जागेवर विकास कामं करता येऊ शकतील.