ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

‘अयोध्येत श्रीराम, बिहारात पलटू राम’, मात्र जे होतं ते चांगल्यासाठीच होतं’, नितीश कुमार यांच्या राजीनामा घडामोडीवर राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई

नितीश कुमार यांनी काल बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत एनडीए सरकारसोबत सत्ता स्थापन केली. या घडामोडीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून इंडिया आघाडीच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी यावर विरोध केला आहे. याशिवाय त्यांनी सामनामध्ये ‘अयोध्येत श्रीराम, बिहारात पलटू राम’ अशा शीर्षकाखाली खरमरीत अग्रलेख लिहिला आहे.

नितीश कुमार यांनी पलटी का मारली हा संशोधनाचा विषय आहे. मात्र जे होतं ते चांगल्यासाठी होतं, इंडिया आघाडी मजबूत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी तेजस्वी यादव यांचा एक व्हिडीओ रिट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये गेल्या १७ महिन्यात बिहारमध्ये झालेल्या विकासाचा पाढाच वाचला. आता तर खेळ सुरू झालाय, खेळ अजून बाकी आहे. मी जे म्हणतो ते करतोय, असंही तेजस्वी यादव यावेळी म्हणाले.

सामनाचा अग्रलेख
नितीश कुमार यांनी पलटी का मारली हा संशोधनाचा विषय आहे. देशावरच पलटूरामांचे राज्य आले आहे. अयोध्येत राम व देशात पलटूराम! अजित पवारांचा 70 हजार कोटींचा घोटाळा स्वतः पंतप्रधान मोदी बाहेर काढतात व नंतर अवघ्या दोन दिवसांत त्याच अजित पवारांना भाजपसोबत घेऊन उपमुख्यमंत्री करतात. नितीश कुमारांचेही तेच. पंतप्रधानच पलटूराम बनले तेथे अयोध्येचा राम तरी काय करणार? पलटूरामांपुढे अयोध्येचा रामही हतबलच झाला आहे.

देशात ‘जय श्रीराम’चे नारे दिले जात आहेत. मात्र बिहारात ‘जय श्री ‘पलटूराम’चा नारा ऐकू येत आहे. हे पलटूराम ‘इंडिया’ आघाडीचे कर्तेधर्ते असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत. मात्र नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा पलटी मारली असून त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर पुन्हा संसार थाटला आहे. लालू यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर काडीमोड घेऊन या वयात पुन्हा भाजपशी संसार थाटणे हा नितीश कुमारांच्या राजकीय जीवनाचा शेवट आहे. नीतिमत्ता व सिद्धांताच्या राजकारणाची बोली लावणाऱ्यांनीच नीतिमत्तेची ऐशी की तैशी केल्यावर भारतीय जनता पक्षाला तरी का दोष द्यायचा?

भाजपवाले म्हणजे बाजारातले सध्याचे सगळ्यात मोठे खरेदीदार आहेत. विकणारे माल विकायला तयार असल्यावर खरेदीदार व ठेकेदार बोली लावणारच. महाराष्ट्रातला माल प्रत्येकी पन्नास-पन्नास खोक्यांना विकला गेला. बिहारच्या मालाचा काय भाव लावलाय ते देशाच्या जनतेला समजायला हवे. नितीश कुमार यांच्याकडे देशाच्या राजकारणातली एक केस स्टडी म्हणून पाहायला हवे. एक माणूस राजकारणात अल्प काळात किती वेळा रंग बदलू शकतो, हा संशोधनाचा विषय आहे. हरयाणात आयाराम-गयाराम तसे बिहारात हे ‘पलटूराम’ असेच म्हणावे लागेल.

जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून आणि हुकूमशाहीविरोधी आंदोलनातून सुरू झालेला नितीश कुमारांचा प्रवास मोदी-शहांच्या हुकूमशाहीपुढे लोटांगण घातल्याने मसणातच संपला आहे व त्याबद्दल त्यांच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीस श्रद्धांजली अर्पण करून जनतेने पुढे जायला हवे.

नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर पुन्हा सत्ता स्थापन करण्याचे ठरवले आहे. हे त्यांचे वय तसे निवृत्तीचे व वानप्रस्थ आश्रमात जाण्याचे, पण तिकडे अयोध्येत श्रीरामांचे आगमन होताच नितीशबाबू मात्र भाजपच्या वनवासी आश्रमात निघाले आहेत. काही महिन्यांपूर्वी नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली, कारण भाजप हा अत्यंत धोकादायक व घातकी पक्ष होता.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे