मुंबई : पोलिस सुरक्षा असतानाही केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड झाल्याच्या घटनेने महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. या प्रकरणावर विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
वडेट्टीवार म्हणाले, “जेव्हा पोलिस सुरक्षेत असलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीही महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत, तेव्हा सामान्य कुटुंबातील महिलांना, विद्यार्थिनींना आणि नोकरदार महिलांना किती संघर्ष करावा लागत असेल, याची कल्पना करता येईल.”
या घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी थेट मंत्र्यांनाच पोलिस ठाणे गाठावे लागले, ही अत्यंत गंभीर बाब आहे. यावरून राज्यात पोलिसांचा धाक उरलेला नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
वडेट्टीवार यांनी आरोप केला की, “गुंडांना आता थेट महायुती सरकारचेच राजकीय संरक्षण मिळत आहे. त्यामुळे पोलीसही बेफिकीर झाले आहेत.”
महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरताना वडेट्टीवार म्हणाले,
”‘लाडक्या बहिणी’चे नारे देणाऱ्या महायुती सरकारला आता त्यांच्या स्वतःच्या मंत्र्यांनीच वास्तवाचा आरसा दाखवला आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री कधी जागे होणार?”
ही घटना महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेच्या भीषण परिस्थितीचे प्रतीक आहे, असे सांगत सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी त्यांनी आग्रही मागणी केली.