X: @therajkaran
मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र दैनिक सामनाच्या (Saamana)अग्रलेखातून ‘मोदी का परिवार’वर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. स्वागताच्या हारामध्येही ज्यांना कोणी दुसरा नेता आलेला चालत नाही ते पंतप्रधान मोदी (PM Modi) जेव्हा ‘मेरा देश, मेरा परिवार’ असा आव आणतात, तेव्हा हसायचे की डोक्यावर हात मारून घ्यायचा, हा प्रश्न पडतो. अशा शब्दात मोदी का परिवारची शिवसेना ठाकरे गटाने खिल्ली उडवली आहे. (Shiv Sena attack on Modi ka parivar campaign)
सामनाच्या अग्रलेखात नमूद केले आहे की, ‘विरोधी पक्षांतील परिवारवादावर बोलणाऱ्या पंतप्रधानांना (PM Modi) दुसऱ्या पक्षातील कुटुंबशाही भाजप परिवारात आलेली चालते, मात्र दहा वर्षांच्या मोदी राजवटीनंतरही विस्थापितच राहिलेले कश्मिरी पंडित या परिवाराचे सदस्य आजही नाहीत. रक्तरंजित मणिपूरही ‘मोदी का परिवार’मध्ये नाही. मोदी सांगत असलेल्या त्यांच्या कुटुंबाचे खरे रूप हे असे आहे. ‘मेरा देश मेरा परिवार’ हा फक्त त्यावर दिलेला मुलामा आहे. ज्या 140 कोटी जनतेला पंतप्रधान मोदी त्यांचे कुटुंबीय म्हणतात तिलाही हा मुलामा आणि आतला खरा चेहरा आता लक्षात आला आहे. ‘मोदी परिवार (Modi Ka Parivar,)’ हा मोदींनीच फुगविलेला फुगा आहे आणि जनताच उद्या तो फोडणार आहे!’ असा टोला शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena Thackray Group) लगावला आहे.
सोशल मीडियावरून तुमचा उदो उदो करणाऱ्या सायबर टोळय़ा हे तुमचे कुटुंब आहे. ‘मोदी मोदी’च्या नशेत तल्लीन ‘भगतगण’ म्हणजे तुमचा परिवार आहे. लोकशाहीमध्ये विरोधक, टीकाकार हेदेखील सत्ताधारी पक्षाने कौटुंबिक सदस्यच समजायचे असतात. मोदी (PM Modi) राजवटीत हे चित्र कधीच दिसले नाही. काँग्रेस पक्ष आणि त्यांचे विचार याविषयी राजकीय मतभेद असू शकतात. सत्तेच्या राजकारणात एका पक्षाने दुसऱ्या पक्षाचा राजकीय पराभव करण्यातही अस्वाभाविक काहीच नाही. परंतु मोदी प्रथम दिवसापासून ‘काँग्रेसमुक्त भारत’ हाच अजेंडा पुढे रेटत आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात, स्वातंत्र्योत्तर विकासात भाजपपेक्षा कितीतरी जास्त योगदान काँग्रेस पक्षाचे आहे, परंतु मोदी आणि त्यांचा पक्ष काँग्रेसमुक्त भारत या वेडाने पछाडला आहे. विरोधी पक्ष, नेते आणि टीकाकारच नव्हे तर पक्षांतर्गत स्पर्धक ठरू शकतील अशी भाजपची मंडळीही ‘मोदी कुटुंबा’च्या परिघाबाहेरच ठेवली जाते किंवा कुटुंबाबाहेर पडण्यास त्यांना भाग पाडले जाते. मोदी यांच्या हुकूमशाहीपुढे मान तुकविणारेच ‘मोदी का परिवार’चे सदस्य बनू शकतात. भाजपमधील ज्येष्ठांनाही ‘मार्गदर्शक’ बनवून परिघाबाहेरच ठेवले गेले, असे सामनाच्या अग्रलेखात नमूद केले आहे.
Also Read: महाराष्ट्र शरद पवारांना 50 वर्षांपासून सहन करतेय : अमित शहांचा हल्लाबोल