मुंबई : महाविकास आघाडीच्या झालेल्या बेठकीत सांगली लोकसभा मतदारसंघाच्या (Sangli Lok Sabha )जागेचा तिढा अखेर सुटला आहे . सांगलीची जागा काँग्रेस ऐवजी शिवसेना ठाकरे गटाला (Thackeray Group) देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे . त्यामुळे काँग्रेसमध्ये (Congress) नाराजी पसरली आहे . या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असणारे विशाल पाटील (Vishal Prakashbapu Patil) यांचे कार्यकर्ते आघाडीच्या या निर्णयामुळे चांगलेच आक्रमक झाले आहेत . त्यांनी सोशल मीडियावरुन नाराजी व्यक्त करणे सुरु केले आहे. ‘आमचे काय चुकले, आता लढायचं, जनतेच्या कोर्टात’, अशी पोस्ट कार्यकर्ते सोशल मीडियावर टाकत आहेत.
महाविकास आघाडीने सांगलीची जागा काँग्रेस ऐवजी शिवसेना ठाकरे गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर आता विश्वजीत कदम, विशाल पाटील, विक्रम सावंत, जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील प्रमुख नेत्यांनी उद्या तातडीने बैठक बोलवली आहे. या बैठकीत मोठा निर्णय घेतला जाणार आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या चर्चेनंतर पुढचा निर्णय घेतला जाईल, असे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. मात्र अंतीम निर्णय विशाल पाटील घेणार आहेत. उद्या बुधवारी सकाळी 11 वाजता बैठक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान आज आघाडीच्या पत्रकार परिषदेपूर्वी विशाल पाटील यांनी एक्स हँडलवर गुढी उभारल्यानंतरचा कुटुंबाचा फोटो पोस्ट केला आहे. तसेच या नव्या वर्षात नकारात्मकतेवर मात करीत नवी आव्हाने, नव्या जबाबदाऱ्या पेलण्यास सज्ज होतोय, असेही त्यामध्ये म्हटले आहे. त्यांच्या या पोस्टमुळे चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान आता सगळी मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार चंद्रहार पाटील निवडणूक लढणार हे निश्चित झालं आहे . महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा निर्णय जाहीर करताच सांगली काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली सुरु झाल्या. पक्षाचे नेते विश्वजित कदम आणि इच्छूक उमेदवार विशाल पाटील नॉट रिचेबल झाले. मात्र कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे . तसेच विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची पोस्ट व्हायरल केली आहे ..