मुंबई – मुंबईत कोस्टल रोड (Coastal road) सुरु झाल्यानंतर त्याचं श्रेय घेण्यासाठी आता राजकीय पक्षांत चढाओढ सुरु झाल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ही कल्पना होती आणि ती आता पूर्णत्वास आली असा दावा, ठाकरे शिवसेनेकडून (Shiv Sena UBT) करण्यात येतोय. तर दुसरीकडं ही जुनी कल्पना होती. उद्धव ठाकरेंच्या आधीपासून हा रस्ता व्हावा, यासाठी प्रयत्न सुरु होते, मात्र त्याला केंद्राकडून परवानगी मिळत नव्हती, असं सांगत हे उद्धव ठाकरेंचं श्रेय नाही, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केलंय. केंद्राकडे यासाठी ठाकरेंच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांनीही प्रयत्न केले होते, मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने परवानगी न मिळाल्यानं अनेक मुख्यमंत्री हात हालवत मुंबईत परतल्याचा उल्लेखही फडणवीसांनी आपल्या भाषणात केला होता. याच धर्तीवर आता कोस्टल रोडची कल्पना नेमकी कुणाची, यावर चर्चा झडू लागलीय. त्यातच यात आणखी एक नाव समोर येतेय.
काँग्रेसचे प्रवक्ते आर्किटेक्ट अनंत गाडगीळ यांची कल्पना?
कोस्टल रोडची मूळ कल्पना ही काँग्रेसचे प्रवक्ते आणि आक्रिटेक्ट अनंत गाडगीळ (Congress spokesperson Anant Gadgil) यांची असल्याचा दावा आता करण्यात येतोय. ही कल्पना अनंत गाडगीळ यांनी १९९७ साली पहिल्यांदा मांडली, अशा आशयाचं पत्रकच गाडगीळ यांनी काढलेलं आहे. याबाबतचा तपशीलही त्यांनी या प्रसिद्धी पत्रकात दिलेला आहे.
१९९७ साली टाईम्स ऑफ इंडियानं अर्बन म्हणजे शहरी विषयातील तज्ज्ञ म्हणून अनंत गाळगीळ यांना मुंबई शहरात होऊ शकणाऱ्या सुधारणा या विषयावर दर आठवड्याला एक लेख लिहिण्याची विनंती केली होती. त्यानुसार मुंबईतील वाहतूक, घरबांधणी, पर्यावरण या विषयावर गाडगीळ यांचे लेख त्यावेळी प्रसिद्ध झाले होते. त्याची कात्रणेच गाडगीळ यांनी पुरावा म्हणून जोडली आहेत.
या लेखात प्रामुख्यानं ३ ते ४ गोष्टींचा उल्लेख करण्यात आला होता. त्यात
१. मुंबई कोस्टल रोड
२. मुंबई रेल्वे वाहतुकीवर उपाययोजना : पूर्व – पश्चिम करण्याची मागणी म्हणजेच मेट्रो-मोनो
३. प्रदूषण कमी करण्यासाठी समुद्राकाठी कमी उंचीच्या तर मध्यभागी उंच इमारती उभाराव्यात असं सुचवण्यात आलं होतं.
गाडगीळांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात १९९७ च्या लेखांचे फोटोही जोडण्यात आलेले आहेत. गाडगीळांने जे उपाय सुचवले होते त्यापेक्षा जास्त खर्चिक आणि लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आल्याचंही या पत्रकात नमूद करण्यात आलेलं आहे. याबाबतचे गाडगीळांचे काही लेख मराठीतील इतरही आघाडीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते, असे गाडगीळ यांनी नमूद केले आहे.
अनंत गाडगीळ यांचा परिचय
माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री विठ्ठराव गाडगीळ यांचे पुत्र अनंतराव गाडगीळ हे काँग्रेसचे नेते आहेत. युनायटेड स्टेट्समध्ये आर्किटेक्चरमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यापूर्वी त्यांनी मुंबई विद्यापीठातून बॅचलर ऑफ आर्किटेक्चरची पदवी घेतली. २०१४ ते २०२२ पर्यंत ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते.