नाशिक- भारत न्याय यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्र पिंजून काढत, काँग्रेसला नवसंजिवनी देण्याचा प्रयत्न राहुल गांधी करताना दिसतायेत. नंदुरबारमधून राज्यात दाखल झालेली राहुल गांधींची भारत न्याय यात्रा धुळे, मालेगावचा टप्पा ओलांडत तिसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यात प्रवेश करते आहे. या दौऱ्यात राहुल गांधी आज त्रंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शनही घेणार आहेत. या यात्रेदम्यान आदिवासी, महिला, शेतकरी, तरुण यांचे प्रश्न मांडतानाच, मोदी सरकारच्याविरोधात राळ उठवण्याचा राहुल यांचा प्रयत्न स्पष्टपणे दिसतोय. यानिमित्तानं कांग्रेसच्या काही जुन्याजणत्या नेत्यांच्या भेटी घेऊन काँग्रेसचा पायाही भक्कम करण्याचा राहुल यांचा प्रयत्न दिसतोय.
नंदूरबारमध्ये सभेत काय घडलं?
नंदुरबारमधून महाराष्ट्रात दाखल झालेल्या भारत न्याय यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. मणिपूरपासून १४ राज्यांचा प्रवास करुन महाराष्ट्रात दाखल झालेल्या राहुल गांधींना पाहण्यासाठी, त्यांचं भाषण ऐकण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय एकत्र येताना दिसतोय.. राहुल गांधींही स्थानिक प्रश्न हेरुन त्या प्रश्नांवरुन मोदी सरकारला घेरण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीयेत. नंदुरबारमध्ये आदिवासींच्या हक्काचा मुद्दा उपस्थित करतानाच, उद्योगपतींना कोट्यवधींची कर्जमाफी देणाऱ्या मोदी सरकारवर त्यांनी टीकास्त्र सोडलं. आदिवासींची देशातील लोकसंख्या ८ टक्के आहे, त्या प्रमाणात सवलती आदिवासींना मिळतायेत का, असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केलाय. जातिनिहाय जनगणना करु, प्रत्येक समाजाला योग्य न्याय देऊ असं आश्वासन राहुल गांधी देताना दिसतायेत.
धुळ्यात महिलांसाठी पाच गॅरंटीची घोषणा
तरुण, महिला, शेतकरी, आदिवासी यांचे प्रश्न राहुल गांधी या भारत न्याय यात्रेत मांडताना दिसतायेत. धुळ्यात महिला न्याय हक्क परिषदेला राहुल गांधींनी उपस्थिती लावली. या परिषदेत महिलांसाठी विशेष पाच गॅरंटींची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आलीय.
काँग्रेसकडून पाच कलमी गॅरंटी
1.महालक्ष्मी गॅरंटी
गरीब महिलांच्या खात्यात एक लाख रुपये दरवर्षी दिले जातील.
2 आधी आबादी पुरा हक
महिलांना शासकीय नोकरीत 50 टक्के आरक्षण.
3 शक्ती का सन्मान
आशा, अंगणवाडी सेविका यांचे उत्पन्न दुप्पट होणार.
4 अधिकार मैत्री
प्रत्येक ग्रामपंचायतीत अधिकार मैत्रीची नियुक्ती. अडीच लाख महिलांना रोजगार
5 सावित्रीबाई फुले हॉस्टेल
प्रत्येक जिल्ह्यात सावित्रीबाई फुले यांच्या नावाने हॉस्टेल
तर तरुणांसाठीही राहुल गांधींनी नव्या घोषणा केलेल्या आहेत.
१. 50 टक्केच्या आरक्षणाची सीमा दूर करणार, त्यासाठी कायद्यात संशोधन करणार.
२. ओबीसी वर्गाला योग्य न्यायला दिला पाहिजे, यासाठी पावलं उचलणार
३. युवा वर्गासाठी 30 लाख भरती प्रक्रिया रबावणार
४. बेरोजगार तरुणांना एका वर्षासाठी 1 लाख देणार, एका वर्षाची एप्रेन्टिशिप देणार
५. पेपर लिकपासून मुक्तीसाठी कायदा करणार
६. आर्थिकदृष्ट्या कमजोर तरुणाना सामाजिक सुरक्षा देणार.
सर्वेक्षणाशिवाय एका दमात आरक्षण देणार, अशी घोषणा राहुल गांधींनी केलीय.
मालेगवाच्या सभेत काय ?
त्यानंतर मालेगावात रोड शो करत, मुस्लीम मतदारांनाही आपलंस करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करताना दिसतायेत.
समाजातील सर्व वर्गांना जोडण्याचा आणि गावागावातच भाजपाविरोधात रण पेटवण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न दिसतोय.
मुस्लीम समाजाला संबोधित करताना देशात सध्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न प्रयत्न सुरु आहे. अशात काँग्रेस प्रेमाचं दुकान चालवत आहे, असं सांगत त्यांनी मुस्लिमांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केलाय.
राहुल गांधींच्या साध्या प्रतिमेचा काँग्रेसला लाभ
राजकीय नेत्याचा अविर्भाव नसणारे, साध्या पॅंट, टी शर्टमध्ये चालणारे, वाटेत सर्वसामान्यांशी संवाद साधणारे, भाषणात सामान्यांचे मुद्दे मांडणारे राहुल गांधी जनतेलाही भावताना दिसतायेत. अनेक जणं गर्दीत त्यांना भेटण्यासाठी, पाहण्यासाठी गर्दी करतायेत. राहुल गांधींही सगळ्यांनी मनमोकळा संवाद ठेवतायेत. गेल्या काही वर्षांपासून राहुल गांधी त्यांची प्रतिमा सामान्यांतील नेता असा करण्याचा प्रयत्न करतायेत. त्यांना मिळणारा पाठिंबा पाहता, यात त्यांना यश आल्याचं दिसतंय.
काँग्रेसच्या जुन्या-जाणत्या नेत्यांच्या भेटीगाठी
या यात्रेच्या निमित्तानं काँग्रेसच्या जुन्या जाणत्या. दुखावलेल्या नेत्यांचीही राहुल गांधी भेट घेताना दिसतायेत.धुळ्यात राहुल यांनी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रोहिदास दाजी पाटील यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी दाजी साहेब रोहिदास पाटील यांच्या प्रकृतीची व वैद्यकीय उपचाराची माहिती घेतली. सोनिया गांधी यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून त्यांच्याशी बोलणं करुन दिलं.
या भेटीनं रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल पाटील भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याची चर्चा रंगलीय.
काँग्रेस-मविआत उत्साह
प्रवासात प्रत्येक गावागावात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा तसंच मोदी सरकारविरोधात जोरदार प्रचार ते करताना दिसतायेत.मुंबईत होणाऱ्या १७ तारखेच्या न्याय यात्रेच्या समारोपाच्या निमित्तानंही मविआ मोठं शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत दिसतायेत. ही सभा ऐतिहासिक होईल, असं काँग्रेसचे नेते सांगतायेत. राहुल गांधी यांच्या या महाराष्ट्र दौऱ्याचा लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर लाभ उचलण्याचा स्थआनिक काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न आहे. राहुल यांची भारत जोडो यात्रा ज्या ज्या ठिकाणी गेली तिथं अनुकूल अनुभव आलास असं मत शरद पवार यांनीही मांडलंय.
कर्नाटकातील भाजपचे सरकार राहुल यांच्या यात्रेमुळे पडल्याचंही ते सांगतायेत. आता राहुल यांच्या मुंबईतील सभेला मविआतील सर्वपक्षीय नेते हजेरी लावणार आहेत. राहुल गांधींच्या न्याय यात्रेचा किती परिणाम महाराष्ट्रात होईल हे पहावं लागणार आहे, मात्र न्याय यात्रेनं लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस आणि मविआला बळ मिळणार हे मात्र नक्की