मुंबई : भाजपने महाराष्ट्रातील लोकसभेच्या २० उमेदवारांची यादी काल जाहीर केली. यामध्ये मुंबईतील दोन मतदारसंघ उत्तर मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबईतील उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली. अद्यापही मुंबईतील चार जागांवरील उमेदवारांची नावं समोर आलेली नाही. दरम्यान उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या तिकीटावरुन बाप लेकामध्ये जोरदार वादावादी झाल्याची माहिती समोर आली आहे. या मतदारसंघातून बाप-लेकामध्ये लढत होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र या मतदारसंघातील विद्यमान खासदार गजानन किर्तीकर येथून निवडणूक लढवणार नसल्याची माहिती आहे.
अमोल किर्तीकर यांनी या उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवू नये यासाठी गजानन किर्तीकरांकडून प्रयत्न केले जात होते. मात्र अमोल किर्तीकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे अमोल किर्तीकरांची मनधरणी करण्याचा गजानान किर्तीकरांचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. ठाकरेंनी ३५ वर्षात साधं नगरसेवक तरी बनवलं का? आता निवडणुकीची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल गजानन किर्तीकरांनी उपस्थित केला आहे. मात्र बाप विरुद्ध मुलगा अशी निवडणूक झाली तर महाराष्ट्रात चुकीचा संदेश दिला जाईल, असं गजानन किर्तीकरांचं म्हणणं आहे. त्यामुळे जर अमोल किर्तीकर निवडणूक लढवण्यावर ठाम असतील तर गजानन किर्तीकर निवडणूक लढवणार नसल्याचं समजते. त्यामुळे गजानन किर्तीकरांच्या ऐवजी या मतदारसंघातून कोणाला तिकीट देणार यासाठी चाचपणी सुरू झाली आहे. शिवसेनेच्या रविंद्र वायकर, उदय सावंत व भाजपच्या पदाधिका-यांची उमेदवारीसाठी चाचपणी सुरू आहे.
दुसरीकडे काँग्रेसचे संजय निरूपम उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहे. काँग्रेसकडून संधी मिळाली नाही तर एकनाथ शिंदेंसोबत ते जाऊ शकतात. त्यामुळे संजय निरुपम एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहे, आणि निरुमप यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे.