Twitter: @NalavadeAnant
मुंबई
पूर्वी निवडणूक आयोग आलेल्या तक्रारींची दखल घेत होते. आताही निवडणूक आयोग निष्क्रिय झाला आहे असे आमचे म्हणणे नाही. कारण निवडणूक आयोगाने राहुल गांधी, प्रियंका गांधी, अरविंद केजरीवाल यांना नोटिसा पाठवल्या आहेत. मग मोदी आणि शाह यांच्यावर कारवाई का नाही? असा संतप्त सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपची सत्ता आल्यास रामभक्तांना अयोध्येतील रामलल्लाचे मोफत दर्शन घडविण्यात येईल, या भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आश्वासनाचा ठाकरे यांनी यावेळी खरपूस समचारही घेतला. १९८७ ची विलेपार्ले पोटनिवडणुक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षासाठी काढून घेण्यात आला होता, याची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांनी आता निवडणूक आचारसंहितेत बदल करण्यात आला आहे काय? आणि केला असेल तर तो कधी आणि केव्हा केला हे सरकारी भाषेत आम्हाला अवगत करावे, अशा तिरकस शब्दात सणसणीत टोला लगावला.
भाजपने निवडणूकपुरती नव्हे तर देशभरातील रामभक्तांना जेव्हा वाटेल तेव्हा मोफत अयोध्यावारी घडवावी, अशी मागणीही ठाकरे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बजरंग बली की जय म्हणत मतदान यंत्राचे बटन दाबण्याचे आवाहन मतदारांना केले होते. आता अमित शहा यांनी रामलल्लाचे मोफत दर्शन घडविण्याचे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून होत असलेल्या धार्मिक प्रचाराकडे पत्रकारांचे लक्ष वेधले.
हे लक्ष वेधताना ठाकरे यांनी आपल्या शैलीत निवडणूक आयोगाला काही शालजोडीतीलही लगावले. तसेच यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. क्रिकेटमध्ये जसे नियम असतात, त्याप्रमाणे निवडणुकीत आचारसंहिता असते. केवळ भाजप सत्तेत बसला आहे म्हणून त्यांना फ्री हिट आणि आम्ही काही केलं की आमची हीट विकेट काढायची. याला मोकळ्या वातावरणातील निवडणुका म्हणू शकत नाहीत, असेही ठाकरे यांनी सुनावले.
१९८७ मध्ये विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली गेली. गर्व से कहो हम हिंदू है हा नारा विश्व हिंदू परिषदेने दिला असला तरीही बाळासाहेब ठाकरे यांनी तो बुलंद केला. मंदिर वही बनाएंगेचे ते दिवस होते. तेव्हा हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचा सहा वर्षासाठी मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. याशिवाय सुभाष देसाई, सूर्यकांत महाडिक, रमाकांत मयेकर, रमेश प्रभू आणि बापू खेडेकर यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने आचारसंहितेत बदल केले असतील अशी शक्यता आम्हाला वाटते. बदल झाला असेल तर आम्हाला अडचण नाही. मात्र ते सर्वांना समान लागू झाले पाहिजेत व कळले पाहिजेत, असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
जर आचारसंहितेत बदल केले असतील तर आम्ही देखील निवडणुकीत जनतेला आवाहन करू की तुम्हीही जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, जय श्रीराम बोलून मतदान करा. राज्यकर्त्यांना सुबुद्धी मिळावी म्हणून गणपती बाप्पा मोरया म्हणून मतदान करा. कारण जे बंधन होते ते अयोग्य होते का आणि आता पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री जे करत आहेत ते योग्य आहे का? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. निवडणूक आचारसंहितेत बदल केले असतील तर ते केव्हा केले आणि ते केवळ भाजपला सांगितले, मग आम्हाला का नाही सांगितले? म्हणून निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचे ठाकरे यांनी नमूद केले.
मनात येईल तेव्हा अयोध्येला जाईन
जानेवारी महिन्यात अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला जाणार आहात असा प्रश्र्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, मनात येईल तेव्हा अयोध्येला जाईन.. भाजप हा जगातील ताकदवान पक्ष आहे. हा पक्ष देशातील १०० कोटी लोकांना घेऊन अयोध्येत विशाल जनसभा घेऊ शकतो. त्यामुळे त्या गर्दीत मी काय जाणार? राम मंदिरचा विषय थंड बस्त्यात होता तेव्हा आणि मुख्यमंत्री झाल्यावर मी अयोध्येला गेलो होतो. आताही मनात येईल तेव्हा अयोध्येला जरूर जाईन, असेही ठाकरे यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
शिवसेना अद्वय हिरेंच्या पाठीशी
रेणुकादेवी सहकारी सूतगिरणीच्या प्रकरणात पोलिसांनी ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना अटक केली आहे. याकडे लक्ष वेधले असता, शिवसेना पक्ष हिरे यांच्या सोबत आणि पाठीशी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आम्ही ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्यावर कारवाई सोडा पण साधी चौकशी सुद्धा होत नाही. त्यामुळे सरकार बदलल्यानंतर सर्वांचा हिशोब होणार. ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांची चौकशी होणार असा खणखणीत इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला.