नागपूर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अजित पवारांना नवाब मलिकांच्या महायुतीतील प्रवेशावर विरोध व्यक्त केल्यानंतर आज स्वत: नवाब मलिक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान काँग्रेस नेत्याच्या एका ट्विटमुळे भाजप कोंडीत पकडला जाण्याची शक्यता आहे. कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमशी जवळीक असलेला आणि मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मिर्ची कुटुंबीयांशी (Iqbal Mirchi) प्रॉपर्टीचा व्यवहार केल्याचा आरोप असलेले प्रफुल्ल पटेल चालतात, मग नवाब मलिक का नाही, असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत (Congress leader Sachin Sawant attacked) यांनी उपस्थित केला आहे.
सचिन सावंत काय म्हणाले?
इतके गंभीर आरोप असतानाही प्रफुल्ल पटेल महायुतीत कसे असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी एका वृत्तपत्रातील बातमी ट्विट करून आपला आक्षेप नोंदवला आहे. (https://twitter.com/sachin_inc/status/1732981378583793687?s=46)
‘नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसले म्हणून भाजपाला आग लागली मग ते इक्बाल मिर्चीशी संबंधीत जागेचा व्यवहार करणारे प्रफुल्ल पटेल कसे चालतात? भाजपाच्या दृष्टीने इक्बाल मिर्ची देशभक्त आहे का? दांभिकपणा भाजपाचा स्थायीभाव आहे. लोकांना मूर्ख समजतात, अशा शब्दात सावंतांनी आपला आक्षेप नोंदवला.
अंबादास दानवेंचा सवाल
विरोधी पक्षनेता अंबादास दानवेंनी फडणवीसांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. दाऊद इब्राहिमच्या खास हस्तकाकडून प्रफुल्ल पटेल यांनी आर्थिक व्यवहार केल्याने ईडीने त्यांची संपत्ती जप्त केली आहे. नवाब मलिक यांच्याबाबत आपल्या भावना तीव्र पद्धतीने व्यक्त केल्या. तशाच भावना प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत आहेत का, असा सवाल उपस्थित केला आहे.

काय आहे प्रकरणं?
इक्बाल मिर्चीच्या 5 प्रॉपर्टी ईडीच्या रडारवर होत्या. यातील एक प्रॉपर्टी मिर्ची कुटुंबीयांनी मिलेनियम डेव्हलपर्सना विकल्याचं समोर आलं होतं. विशेष म्हणजे ही कंपनी प्रफुल्ल पटेलांशी संबंधित आहे. 2007 मध्ये मिर्ची कुटुंबीय आणि मिलेनियमकडून वरळीत सीजे हाऊसचं बांधकाम करण्यात आलं. या सीजे हाऊसमधील 14 हजार चौ. फुटांची जागा मिर्ची कुटुंबाला देण्यात आली होती. सीजे हाऊस व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशय ईडीने व्यक्त केला होता. यानंतर सीजे हाऊसमधील चार मजले ईडीकडून जप्त करण्यात आला.