X: @therajkaran
मुंबई: भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या (Ganpat Gaikwad) पत्नी सुलभाताई गायकवाड (Sulbhatai Gaikwad) आगामी विधान सहा निवडणुकीत (Vidhan Sabha) कल्याण पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सक्रिय झाल्या आहेत. एकीकडे पती गणपत गायकवाड शिवसेना पदाधिकारी महेश गायकवाड याच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने कारागृहात आहेत. तर या प्रकरणातील आरोपी त्यांचा मुलगा वैभव गायकवाड फरार आहे. असे असताना देखील त्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शिंदे गटाचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्या चिंचपाडा परिसरातील जनसंपर्क कार्यालयाबाहेर विकास कामाचे भूमीपूजन करत सुलभाताई गायकवाड यांनी शक्ती प्रदर्शन केले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सुलभा गायकवाड यांचे जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करत फटाके वाजवून जल्लोषात स्वागत करण्यात आले. महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड तळोजा कारागृहात आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर कल्याण पूर्व मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार झाला होता. मात्र भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड या मैदानात उतरल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार गायकवाड यांच्या निधीतून मंजूर विविध विकासकामांचे भूमिपूजन सुलभा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
याआधी कल्याण कोळशेवाडी परिसरात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्याकडून बॅनरबाजी झाली होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व्हिसीद्वारे अनावरण झाले होते. त्यावेळी कल्याण पूर्व परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शन करण्यात आले. आमदार गणपत काळू गायकवाड यांच्यासह तमाम जनतेने पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. माननीय आमदार गणपत गायकवाड यांनी केलेला पाठपुरावा अशा आशयाचे बॅनर लागले होते.