मुंबई : लोकसभा निवडणुकीत एकला चलो रे ची भूमिका घेतलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी स्वबळावर लढण्याचा सूर आता बदलला आहे .महाविकास आघाडीला भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल तर त्यांनी हातकणंगले मतदारसंघात (Hatkanangale loksabha )उमदेवार न उभा करता मला पाठींबा जाहीर करावा असे ते म्हणाले . तसेच मी पाठींबा घ्यायला तयार आहे , पण आघाडीत (Maha Vikas Aghadi) येणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे .
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane)हे खासदार आहेत. त्यांच्या विरोधात राजू शेट्टी हे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. ही जागा शिवसेनेकडे असल्याने महाविकास आघाडीने आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी करत राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंची दोन वेळा भेट घेतली होती. आपण महाविकास आघाडीमध्ये येणार नाही, पण आपल्याला पाठिंबा द्यावा अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे ..दरम्यान जवळपास तीन वर्षांपूर्वी मविआचे प्रमुख शरद पवार यांना आम्ही आघाडी का सोडतोय याबाबत एक नऊ पानी पत्र लिहले होते. पण त्या पत्राची साधी दखलही मविआने घेतली नव्हती. त्यामुळे मविआ आघाडीमधून निवडणूक लढवायची नाही, तर स्वतंत्र निवडणूक लढवायची हा निर्णय आम्ही घेतला होता आणितो आजही कायम असल्याचं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे .आम्ही 2015 पासून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहोत. खरं तर या आधीपासूनच आम्ही भाजपचे विरोधक आहोत. त्यामुळे आम्ही भाजपसोबत जाणार नाही, या आमच्या भूमिकेवर देखील आम्ही ठाम आहोत असे शेट्टी म्हणाले. मागेच स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीमध्ये महाविकास आघाडीसोबत असणारे सगळे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता. स्वाभिमानीने इथून पुढे ज्या काही निवडणुका लढवायच्या आहेत स्वतंत्र लढवायच्या हा निर्णय घेतला असेही त्यांनी सांगितले आहे . .
दरम्यान दुसरीकडे हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी आमच्यासोबत असावेत असं आम्हाला वाटत होतं. पण त्यांचा वेगळा पवित्रा दिसतो. शिवसेना नेत्यांसोबत त्यांच्या भेटीगाठी, बैठका सुरू असल्याचं मला समजलं. ते मविआसोबत येतील अशी अपेक्षा होती. पण सध्याचं चित्र मला दिसत नाही. आता त्यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा घेतला नाही तर मग आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. आम्हाला त्या मतदारसंघात उमेदवार द्यावा लागेल, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil )यांनी सांगितलं आहे .