मुंबई- २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं उद्धव ठाकरे यांची फसवणूक केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय. गोरोगावात आयोजित युवा स्वाभिमान मेळाव्यात ते बोलत होते. भाजपा ही भारतीय जनता पार्टी नसून भारतीय जुमला पार्टी असल्याची टीकाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केलीय.
चंद्रावरुन खासदार आणणार का- आदित्य
देशात ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचा संकल्प भाजपानं केलेला आहे. मात्र प्रत्यक्षात भाजपाचे इतके खासदार निवडून येणार नाहीत, असा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय. ४०० पेक्षा कमी खासदार निवडून येतील, मग काय चंद्रावरुन खासदार आणणार का, असा सवालही त्यांनी केलाय.
दक्षिणेकडच्या राज्यांनी भाजपाला नाकारलेले आहे. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्येही भाजपाला किती जागा मिळतील याबाबत साशंकता असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत.
पीएम केअर फंडांवरही आक्षेप
खिचडी घोटाळा प्रकरणावरुन सध्या मुंबईत सुरु असलेल्या कारवाईवरुनही आदित्य ठाकरेंनी भाजपावर शरसंधान केलंय., पीएम केअर फंडाचा खर्चही जाहीर करा, अशी मागणीही त्यांनी केलीय.