मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिललेया कोल्हापूर (Kolhapur) आणि हातकणंगले (Hatkanangale )मतदारसंघात राजकीय घडामोडीना वेग आला आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )आज पुन्हा कोल्हापुरात येत आहेत . त्यांच्या उपस्थितीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) यांचा उमेदवारी अर्ज जोरदार अशा शक्ती प्रदर्शनाने आज भरला जाणार आहे. तर दुसरीकडे हातकणंगले मतदारसंघात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रिंगणात उतरलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetti) देखील आज आपला उमदेवार अर्ज दाखल करणार आहेत . त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे राजकारण आता गतिमान झाले आहे.
हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासह महायुतीचे धैर्यशील माने, वंचितचे डीसी पाटील, अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरूडकर यांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये आता पंचरंगी लढत रंगणार आहे. त्यामुळे आता या मतदारसंघामध्ये काय होणार याचे उत्तर 4 जून रोजीच मिळणार आहे. दरम्यान आज कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून ते बैलगाडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात राजू शेट्टी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे. ही लढाई एकट्याची नसून आपल्या सर्वांची आहे हे दाखवण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दसरा चौकात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केलं आहे. राजू शेट्टी चौथ्यांदा हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये रिंगणात असून त्यांच्यासमोर तब्बल चार उमेदवारांचे आव्हान असणार आहे.त्यामुळे या मतदारसंघात यंदा बाजी कोणाची लागणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहचली आहे
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी कोल्हापूर दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी हातकणंगलेत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला . मात्र तरीही ते निवडणूक लढण्यावर ठाम राहिले .तसेच रविवारी मध्यरात्री आमदार विनय कोरे (Vinay Kore) आणि समर्थक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar) यांची सुद्धा भेट घेत मुख्यमंत्र्यांनी मनधरणी केली. हे दोन्ही सध्या महायुतीमध्ये असले तरी त्यांनी अजूनही माने यांचा प्रचार म्हणावा तसा सुरू केलेला नाही. त्यामुळे महायुतीपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे . मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची निवासस्थानी भेट घेत माने यांच्या प्रचारामध्ये सक्रिय होण्याचे आवाहन केले आहे .