@therajkaran
बदलापूर: शहरातील आदर्श विद्यालयातील (Adarsh School) दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराची शासन आणि पोलिसांनी दखल घ्यावी यासाठी सर्वसामान्य बदलापूरकर नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल झाले. यात काही गृहिणी तसेच विद्यार्थी देखील आहेत. त्यांच्या भविष्याचा विचार करता हे गुन्हे मागे घेण्यात यावे, यासाठी शहरातील सजग युवक नेतृत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले (Captain Ashish Damle) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली, तसेच लेखी निवेदन सादर केले.
त्या दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची शाळा व्यवस्थापन आणि बदलापूर पोलिस दखल घेत नव्हते. पालकांनी आंदोलनाचा पूर्व इशारा देऊनही या दोन्ही घटकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यातून शहरभर संतापाची लाट उसळली होती आणि त्याचे पर्यवसान २० ऑगस्ट च्या न भूतो न भविष्याती अशा आंदोलनात झाले.
आशिष दामले यांनी अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले की ते स्वयंस्फूर्तीने झालेले आंदोलन होते, त्या आंदोलनाला चेहरा नव्हता आणि राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता.
या आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागली, त्यातून त्याच दिवशी विशेष तपास पथक (SIT) नेमले गेले, ऍड उज्ज्वल निकम (Adv Ujjwal Nikam) यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक केली गेली, अवघ्या महिनाभरात न्यायालयात आरोपीविरुद्ध आरोपपत्र सादर झाले, हे या आंदोलनाचे यश आहे, याकडे कॅप्टन दामले यांनी लक्ष वेधले.
ते म्हणाले, एका घटनेत २३ सप्टेंबर रोजी आरोपी मारला गेला. एक अध्याय संपला, पण ज्या सर्वसामान्य बदलापूरकरांनी आंदोलन केले, त्यांना मात्र दर आठवड्याला न्यायालयात हजेरीसाठी जावे लागत आहे.
रेल्वे पोलीस (railway police) आणि राज्य पोलिसांनी (state police) २० ऑगस्ट रोजी कसलाही विचार न करता जो समोर येईल त्याला अटक केली. यात सर्वसामान्य गृहिणी आहेत, विद्यार्थी, तरुण आणि पत्रकार देखील आहेत, याकडेही आशिष दामले यांनी लक्ष वेधले.
दामले यांनी अजित पवार यांना विनंती केली की असे गुन्हे नोंदवले गेल्याने या तरुण आणि विद्यार्थ्यांचे भविष्य अडचणीत आले आहे. त्यामुळे बदलापूर मधील त्या दिवशी नोंदवण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेऊन या आंदोलनकर्त्यांना न्याय द्यावा. यावर कायदेशीर बाबी तपासून बघू आणि सकारात्मक विचार करण्याची ग्वाही अजित पवार यांनी दिल्याची माहिती कॅप्टन आशिष दामले यांनी दिली.