नवी दिल्ली – अमरावतीच्या खासदार आणि लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांचं राजकीय भवितव्य आज ठरणार आहे. राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध की अवैध यावर सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजयानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले आनंदराव अडसूळ यांनी या प्रकरणी कोर्टात धाव घेतली होती. आता सुप्रीम कोर्टानं राणा यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यास त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते, तसचं येत्या निवडणुकीत त्यांना देण्यात आलेलं भाजपाचं तिकीटही रद्द होण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
- जात प्रमाणपत्रासाठी शाळेचा खोटा दाखल दिल्याचा नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर आरोप
- बनावट कागदपत्रांच्या आधारे चांभार जात राणांनी दाखवल्याचा आरोप
- बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून अनूसूचित जातीचा दाखला घेतला
- मुंबई हायकोर्टानं राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं.
- यावेळी कोर्टानं राणा यांना 2 लाखांचा दंडही ठोठावला
- मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला नवनीत राणांकडून सुप्रीम कोर्टात आव्हान
- या प्रकरणात 2014 साली मुलुंडच्या पोलीस ठाण्यातही राणा आणि त्यांचे वडील हरभजनसिंग कौर यांच्या विरोधात गुन्हा
- शिवडी कोर्टात सुनावणीवेळी, सुप्रीम कोर्टात प्रकरण असल्याचा सेशन कोर्टात राणांचा युक्तिवाद
- शिवडी कोर्टाकडूनही राणांवर अटकेची टांगती तलवार
- नवनीत राणा यांचे वडील 2023 साली फरार म्हणून शिवडी कोर्टाकडून घोषित
- राणांनी वडील, अजोबा, पणजोबा, खापर पणजोबांची खोटी जात प्रमाणपत्रं सादर केल्याचा आरोप
- सुप्रीम कोर्टात 22 सुनावण्यांनतर निकालाकडं लक्ष
आजचा निर्णय का महत्त्वाचा
सुप्रीम कोर्टाच्या २० ते २५ तारखा नवनीत राणा यांनी मॅनेज केल्याचा गंभीर आरोप आडसुळांनी केलाय. सुमारे चारे वर्षांनंतरचा हा निकाल आनंद अडसूळ यांच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. आता तरी निकालात न्याय होईल, अशी अपेक्षा आनंदराव अडसूळ व्यक्त करतायेत. २०१९ लोकसभा निवडणुकांनंतर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हे भाजपासोबत असल्याचं पाहायला मिळालंय.
विरोधानंतरही राणा यांनाच उमेदवारी
नवनीत राणा यांच्याविरोधात सुरु असलेलं सुप्रीम कोर्टातील प्रकरण, स्थानिक भाजपा पदाधिकारी, शिंदेंच्या शिवसेनेचे अडसूळ आणि बच्चू कडू यांचा विरोध असतानाही राणा यांनाच तिकीट जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर राणा यांनी भाजपात प्रवेशही केलाय. बच्चू कडू यांनी राणांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीतून वेगळं होऊन स्वतंत्र लढणार हे जाहीर केलेलं आहे आणि राणा यांच्याविरोधात उमेदवाराची घोषणाही केलेली आहे. अशा स्थितीत राणा यांना भाजपानं तिकीट दिलेलं आहे. आता या निर्णयानंतर काय होणार हे पहावं लागणार आहे.
हेही वाचाःशिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा उमेदवार?, ठाण्याचा तिढा सोडवण्यासाठी कोणता फॉर्म्युला?