मुंबई- महायुतीत तीन ते चार जागांवरुन तिढा अद्याप कायम आहे. त्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि मुख्यमंत्री एकतनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याचा समावेश आहे. ठाणे परिसरात ठाणे, कल्याण आणि पालघर या तिन्ही मतदारसंघात शिवसेनेचे खासदार आहेत. त्यातील ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपाला मिळावा, यासाठी भाजपा नेते आग्रही असल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडे शिंदेंची शिवसेना हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाहीये. अशात तोडगा काढण्यासाठी चर्चेत एका फॉर्म्युल्याची चर्चा सुरुये. त्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर भाजपाचा उमेदवार रिंगणात उतरेल अशी शक्यता आहे. ठाण्याच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि भाजपाचे संभाव्य उमेदवार एकत्र दिसल्यानं चर्चांना तोंड फुटलेलं आहे.
शिंदेंच्या शिवसेनेकडे प्रभावी उमेदवाराची वानवा?
या मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. शिंदेंच्या बंडानंतरही विचारे हे ठाकरेंसोबतच राहिलेले आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून आमदार रवींद्र फाटक आणि प्रताप सरनाईक यांची नावे चर्चेत आहेत. ठाणे लोकसभेत नवी मुबंई आणि मिरा भाईंदर परिसराचा समावेश होतो. या दोन्ही नेत्यांचा प्रभाव पूर्म मतदारसंघावर नसल्याचं सांगण्यात येतंय.
भाजपाकडून संजीव नाईक धनुष्यबाण चिन्हावर?
ठाणे मतदारसंघातून गणेश नाईक किंवा त्यांचे पुत्र संजीव नाईक यांना उमेदवारी देण्याची मागणी भाजपातून होते आहे. नवी मुंबई परिसरातवर नाईक यांचा चांगला प्रभाव आहे. अजित पवारांकडूनही नाईक यांच्या नावाला पाठिंबा असल्याची माहिती आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात नाईक यांना उमेदवारी दिली तरी त्यांनी धनुष्यबाण चिन्हावर लढावे लागेल, अशीही चर्चा सध्या आहे. हा फॉर्म्युला मान्य झाल्यास येत्या दोन ते तीन दिवसांत त्यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचाः‘कितीबी येऊ दे समोर, एकटा बास’, सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा