मुंबई- साताऱ्यात खासदार उदयनराजेंच्या मतदारसंघात जाऊन, त्यांच्याप्रमाणे कॉलर उडवून दाखवणाऱ्या शरद पवारांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. हाच पवारांचा फोटो सुप्रिया सुळेंनी स्टेटस म्हणून ठेवला आहे. या स्टेटला ‘कितीबी येऊ द्या समोर, एकटा बास’, हे गाणंही त्यांनी लावलं आहे. कितीही विरोधक समोर आले तरी एकटे शरद पवार सगळ्यांना पुरुन उरतील, असा संदेश या पोस्टमधून अजित पवार आणि महायुतीच्या नेत्यांना सुप्रिया सुळेंनी दिल्याचं मानण्यात येतंय.
साताऱ्यात शरद पवारांनी का उडवली कॉलर?
दिल्लीत जाऊन साताऱ्याची उमेदवारी मिळवणाऱ्या उदयनराजेंनी गेल्या आठवड्यात साताऱ्यात जोरदार शक्तिप्रदर्शनं केलं. साताऱ्यात भाजपाच्या चिन्हावर उदयनराजेच उभे राहीतल असे स्पष्ट संकेत या शक्तिप्रदर्शनानंतर देण्यात आलेत. या शक्तिप्रदर्शनानंतर त्यांच्यासमोर शरद पवार कुणाला मैदानात उतरवणार, याची चर्चा होती. सातारा दौऱ्यावर असलेल्या पवारांनी उमेदवारांची चाचपणी केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना उदयनराजेंशी काही बोलणं झालं का, असा सवाल विचारण्यात आला, त्यावर त्यांनी नाही, अजिबात नाही, असं उत्तर दिलं. त्यानंतर उदयनराजेंची कॉलर उड़वणार का, असा सवाल त्यांन केला होता. त्यावेळी पवारांनी कॉलर उडवून दाखवली. यानंतर साताऱ्यात कोण कुणाची कॉलर उडवणार, असा प्रश्न विचारण्यात येतोय.
साताऱ्यातून मविआकडून कुणाला संधी
साताऱ्यातून श्रीविकास पाटील यांना पुन्हा संधी मिळेल, असं वाटत होतं. पवारांनीही त्यांना आग्रह धरला होता. मात्र प्रकृतीचं कारण त्यांनी दिल्यानं ते निवडणूक मैदानात नसतील असं पवारांनीच स्पष्ट केलेलं आहे. पक्षातील शशिकांत शिंदे, सत्यजित पाटणकर अशी नावं चर्चेत आहेत. दुसरीकडे जंयत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात झालेल्या चर्चेनंतर, पृथ्वीराज चव्हाण यांना संधी मिळेल का, अशीही चर्चा रंगते आहे.
हेही वाचा – लोकसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न; दिल्लीच्या रामलीला मैदानात विरोधकांचं जोरदार शक्तिप्रदर्शन