नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाकडून पुन्हा एकदा काँग्रेसला थकबाकीची नोटीस बजावण्यात आली आहे. आता काँग्रेसला तब्बल १७४५ कोटींची नोटीस बजावण्यात आली आहे. २०१४-१५ ते २०१६-१६ या मूल्यांकन वर्षासाठी ही थकबाकी पाठवण्यात आली असून त्यामुळे काँग्रेसच्या प्राप्तिकराची एकूण करथकबाकी ३,५६७ कोटींच्या घरात गेली आहे. लोकसभा काही दिवसांवर येऊन ठेवलेली असताना काँग्रेसला करथकबाकीची नोटीस बजावण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेसला १८२३ कोटींची नोटीस बजावण्यात आली होती. काँग्रेसच्या काही नेत्यांवर टाकलेल्या छाप्यादरम्यान आढळलेल्या डायरीमध्ये नोंद असलेल्या तृतीय पक्षांकडून जमा झालेल्या पैशांवरही काँग्रेसला कर आकारण्यात आला आहे, अशी माहितीही समोर आली आहे.
काँग्रेसने पत्रकार परिषद घेत यावर निषेध व्यक्त केला होता. यावेळी त्यांनी शुक्रवारी सांगितलं होतं की, आयकर विभागाकडून सुमारे 1,823 कोटी रुपये भरण्यास सांगणारी नोटीस मिळाली आहे. मागील वर्षांशी संबंधित कर मागण्यांसाठी कर अधिकाऱ्यांनी पक्षाच्या खात्यातून 135 कोटी रुपये आधीच काढले आहेत.
135 कोटींच्या कर मागणीविरोधात काँग्रेसने न्यायालयात धाव घेतली असून या प्रकरणावर आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. आयकर न्यायाधिकरण आणि उच्च न्यायालयाकडून या संदर्भात कोणताही दिलासा मिळवण्यात पक्षाला अपयश आलं आहे.