महाराष्ट्र ताज्या बातम्या

अखेर नारायण राणेच ठरले महायुतीचे उमेदवार

प्रकल्प पूर्ण करू शकणारा लोकप्रतिनिधी ठरली जमेची बाजू

X: @ajaaysaroj

मुंबई: बहुचर्चित, बहुप्रतिक्षित आणि अत्यंत हाय व्होल्टेज ड्रामा अपेक्षित असलेल्या सिंधुदुर्ग – रत्नागिरी मतदारसंघातून (Sindhudurg – Ratnagiri Lok Sabha)अखेर महायुतीचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP candidate Narayan Rane) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील (Mahavika Aghadi) शिवसेना उबाठा गटाच्या विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांच्याशी त्यांची लढत होईल. कोकणातील लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे नियोजित प्रकल्प पूर्ण करायचे असतील तर त्याला विरोध करणाऱ्यांना तडफेने उत्तर देणाराच लोकप्रतिनिधी हवा याची जाण केंद्रीय नेतृत्वाला व्यवस्थित असल्याने राणे यांच्या शिवाय दुसरा तगडा पर्याय भाजपकडे (BJP) नव्हताच हे यातून सिद्ध झाले.

भाजपकडून ज्येष्ठ नेते प्रमोद जठार, डॉ निलेश राणे, तर शिवसेनेकडून किरण सामंत (Kiran Samant) यांच्या नावांची चर्चा अगदी गेले वर्षे दिडवर्षे सुरू आहे. स्वतः नारायण राणे यांनी निवडणूक लढण्यास आपण इच्छुक नसल्याचे पक्ष नेतृत्वाला कळवले आहे, अशी चर्चा सुरू झाल्यानंतर तर ही जागा शिवसेना (Shiv Sena) घेणारच अशी हवा झाली होती. मात्र विरोधासाठी विरोध म्हणून अनेक विकासप्रकल्प रत्नागिरी – सिंधुदुर्गात अडवले गेले. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan), शिवसेना नेते व उद्योग मंत्री उदय सामंत, महायुतीचे मतदारसंघात असणारे चारही आमदार यांनी आणलेले, व लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारे प्रोजेक्ट, केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी रद्द करायला लावण्यात आले.

 याला कारणीभूत फक्त राजकीय वाद आणि वैयक्तिक विरोध एवढेच आहे, असा इथला कोकणी माणूस खुलेआम बोलतो. सी वर्ल्ड प्रकल्प, बारसु आणि नाणार प्रकल्प (Nanar Petrochemical project) अशी उदाहरणे देत, या प्रकल्पामुळे आमच्या कोकणातील तरुणाला रोजगार उपलब्ध झाला असता, तो या राजकारणी लोकांनी घालवायला घेतला आहे, असेही सांगायला हा कोकणी (Konkani) माणूस मागे हटत नाही. इथे केवळ पर्यटन (Tourism in Konkan) म्हणून आठ दिवस येणाऱ्यांनी तिकडे मुंबईत बसून निसर्ग कसा वाचवायचा याचे धडे आम्हाला देऊ नये, त्यापेक्षा आता सुरू करण्यात येणारे मोठे प्रकल्प, निसर्गाच्या मदतीनेच कसे राबवता येतील, त्यातून लाखो रोजगार कसे निर्माण होतील याची काळजी घ्यावी, असे सुनवायला देखील कोकणी माणूस कमी पडत नाही. हेच मोठे प्रकल्प राबवायचे असतील, लोकांना विश्वासात घेऊन विरोध मोडून काढायचा असेल तर लोकप्रतिनिधी देखील तेवढ्याच ताकदीचा हवा, हे केंद्रीय नेतृत्वाला उमजले असल्याने राणेंच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाल्याचे कोकणात बोलले जात आहे.

या लोकसभा मतदारसंघात सावंतवाडीचे दीपक केसरकर, कणकवलीचे नितेश राणे, रत्नागिरीचे उदय सामंत आणि चिपळूणचे शेखर निकम हे चार आमदार महायुतीचे आहेत, तर राजापुरचे राजन साळवी व कुडाळचे वैभव नाईक हे महाविकास आघाडीचे आमदार आहेत. कोकण पट्ट्यात प्रामुख्याने तळकोकणात शिवसेनेला मानणारा मतदार आहे. त्याने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यावर प्रेम केले आहे. या कोकणानेच शिवसेना रुजवली आणि फुलवली आहे. पण अल्पसंख्याक वर्गाचे लांगूलचालन करणारी, हिंदुत्वाला नावं ठेवणारी काँग्रेस (Congress) आणि प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेना कशी संपवता येईल याचा आयुष्यभर प्रयत्न करणारे शरद पवार (Sharad Pawar) यांना शेवटपर्यंत ज्या बाळासाहेबांनी विरोध केला त्याच शरद पवार आणि कॉंग्रेसला केवळ सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी डोक्यावर घेऊन नाचणारे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कोकणात अनेकांच्या मनात नाराजी निर्माण करून गेले आहेत. देशात कट्टर सनातनी वारे वाहत असताना औरंगजेब (Aurangzeb), टिपू सुल्तान (Tipu Sultan), अफजलखानची कबर, पालघर येथील साधूंची हत्या (Palghar Sadhu murder case), अशा घटनांमध्ये मौन धारण  करणारे उद्धव सरकार कोकणी लोकांच्या नाराजीचे कारण झाले असल्याचे इथल्या चाकरमान्यांशी बोलले असता जाणवते. मात्र, उद्धव ठाकरेंना एकाकी पाडून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व सहकारी शिवसेना फोडून बाहेर पडले हे देखील याच कट्टर कोकणी लोकांना आवडलेले नाही. त्या नाराजीचा फटका शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराला बसला असता ही सार्थ भीती महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांमध्ये असल्याने शिवसेना विरुद्ध उबाठा शिवसेना (Shiv Sena UBT) असा सामना किमान कोकणात तरी होऊ न देण्याची हुशारी या नेत्यांनी दाखवली व उमेदवारी भाजपच्या (BJP) तगड्या नेत्याला दिली अशी चर्चा राजकिय वर्तुळात आहे.

कोकणात जसा शिवसेनेला मानणारा मतदार आहे तसाच पारंपरिक भाजपला मानणारा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुशीत तयार झालेला ही एक मोठा वर्ग येथे पूर्वापार आहे. गेली कित्येक दशके स्वर्गीय अप्पा गोगटे, ज्येष्ठ नेते माधव भंडारी, अजित गोगटे,  विनय नातू, बाळ माने, प्रमोद जठार यांच्या सारख्या अनेक मंडळींनी या मतदारसंघात संघाची मोठी फळी उभी केली आहे. प्रसिद्धीपासून लांब राहून काम करत रहाणे, पक्ष संघटना उभी करणे एवढेच यांना माहीत असते. असे कित्येक संघ स्वयंसेवक आता नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी झटून कामाला लागतील. त्यांच्यासाठी कमळ ही निशाणीच महत्वाची आहे. त्याशिवाय नारायण राणे यांचा स्वतःचा असा एक करिष्मा कोकणात आहे. शेकडो कट्टर विरोधक राणे कुटुंबियांना इथे कोकणात असतील पण त्याहून जास्त प्रेम करणारा कोकणी माणूस राणे कुटुंबाच्या कायम मागे उभा राहिला आहे. राणे जेव्हा शिवसेना सोडून बाहेर पडले, त्यानंतर झालेल्या निवडणुकीत याच कोकणी माणसाने नारायण राणेंना प्रचंड मताधिक्याने शिवसेनेच्या विरोधात जिंकून दिले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत, त्यांनी कोकणात सभा घेतल्यानंतरही एकसंघ शिवसेना नारायण राणेंचा पराभव करू शकली नव्हती ही बाब विसरून चालणार नाही. अर्थात त्यानंतर राणे कुटुंबियांना इथे पराभव देखील बघावा लागला हेही सत्य आहे.

पण आता परिस्थिती खूपच वेगळी आहे. आमदार निधी, खासदार निधी,  ग्राम पंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामे या सर्व मतदारसंघात करण्यात आली आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातूनही कोट्यावधीचा विकासनिधी इथे आणला गेला आहे. हा लोकसभा मतदारसंघ भाजपनेच लढवायचा याचे शिस्तबद्ध नियोजन गेली पाच वर्षे करण्यात आले होते. उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्याशी राजकीय पाट लावल्यानंतर लगेच भाजपने संपूर्ण महाराष्ट्रात आपली स्ट्रॅटेजी बदलली होती. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी – सिंधुदुर्गमध्ये माजी खासदार डॉ निलेश राणे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांनी हातात हात घालून हा संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्याला चिपळूणमधून शेखर निकम, सावंतवाडीमधून दीपक केसरकर तर कणकवलीमधून खुद्द नितेश राणे यांची साथ मिळेल.  उदय सामंत व किरण सामंत या बंधूंची समजूत काढण्यात फडणवीस – शिंदे यांना कितपत यश आले आहे याच्यावर रत्नागिरीचे गणित अवलंबून असेल. अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप देखील या रत्नागिरी मतदारसंघात स्ट्रॉंग आहेच. पण ज्या सामंत ब्रदर्सच्या जोरावर आजपर्यंत विनायक राऊत (MP Vinayak Raut) निवडून येत होते, तेच सामंत बंधू जर मनापासून इथे महायुतीच्या बाजूने उतरले तर भाजपला इथून लक्षणीय मताधिक्य मिळू शकते हे निश्चित.

उबाठा गटाचे राऊत व महायुतीचे राणे, या दोघांनीही आपण लाखोंच्या मताने निवडून येऊ असा दावा केला आहे. कोणाचा दावा खरा ठरतो आणि कोणाचा हवेत विरतो हे चार जूनला स्पष्ट होणार आहे.

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात