X: @vivekbhavsar
मुंबई: राज्याचे माजी पोलीस आयुक्त आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग (National Stock exchange phone tapping case) प्रकरणातील संशयित आरोपी संजय पांडे (IPS Sanjay Pandey) हे वर्सोवा मतदार संघातून विधान सभेत नशीब आजमावणार आहेत. या मतदारसंघात भाजपच्या भारती लव्हेकर या दुसऱ्यांदा निवडून आल्या असल्या तरी यंदा त्यांना मतदारसंघात प्रचंड विरोधाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मोहित कंबोज (Mohit Kamboj Bharatiya) हे या मतदारसंघातून भाजपकडे तिकीट मागणार असल्याचे समजते.
काँग्रेसकडे मुंबईत उत्तर भारतीय (North Indian) चेहरा नसल्याने माजी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. यासाठी काँग्रेस खासदार प्रा वर्षा गायकवाड (Congress MP Varsha Gaikwad) आणि सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी महत्वाची भूमिका बजावली.
Also Read: उद्धव सेनेला कोंडीत पकडण्यासाठी दसऱ्या आधीच निवडणूक आचारसंहिता?
काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या वर्सोवा मतदारसंघात २०१४ मध्ये भारती लव्हेकर (BJP MLA Bharati Lavekar) या अपक्ष असूनही निवडून आल्या. तोपर्यंत त्यांची ओळख दिवंगत विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या कट्टर समर्थक अशी होती. दिवंगत मेटेदेखील भाजपच्या (BJP) कोट्यातून विधान परिषदेवर निवडून गेले होते. नंतर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्षपद देण्यात आले होते.
भारती लव्हेकर यांनी २०१९ मध्ये भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविली, २०२४ आणि २०२९ अशा दोन्ही वेळा त्यांनी काँग्रेसचे बलदेव खोसा (Baldev Khosa) यांचा पराभव करत विजयश्री खेचून आणली. मात्र, या दोन्ही निवडणुकीत लव्हेकर यांचे मताधिक्य २० टक्क्यावरून ४ टक्के असे घसरले.
दिवंगत काँग्रेस नेते गुरुदास कामत (Gurudas Kamat) यांचे वर्चस्व असलेला हा मतदारसंघ २०१४ मधील मोदी लाटेत शिवसेनेचे गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी कामत यांच्याकडून हिरावून घेतला.
गेल्या दहा वर्षात भाजप आणि मोदी (PM Narendra Modi) यांच्या विरोधात देशभरात नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. राज्यातही भाजप खासकरून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबद्दल अत्यंत नकारात्मक वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha election) ज्याप्रमाणे भाजपला फटका बसला तसाच आता विधानसभा निवडणुकीतही (Assembly elections 2024) बसेल असे खुद्द भाजप आणि संघातील (RSS) नेते खाजगीत कबूल करत आहेत.
राज्यात काँग्रेसला सर्वाधिक सकारात्मक वातावरण असेल असे वेगवेगळे सर्वेक्षण
अहवाल सांगत आहेत. याच काँग्रेस लाटेचा फायदा उचलण्यासाठी काँग्रेसने संजय पांडे या १९८६ च्या तुकडीच्या भारतीय पोलिस दलातील (IPS) निवृत्त अधिकाऱ्याला काँग्रेसमध्ये प्रवेश दिला. त्यांना वर्सोवा या मतदारसंघातून (Versova Assembly constituency) निवडणूक लढवण्यासाठी तयार केले जात आहे. पांडे यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.
मात्र, काँग्रेसमधील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार एखाद्याने पक्षात प्रवेश केला की तो सांगेल त्याच मतदारसंघात त्याला उमेदवारी दिली जाईल अशी खात्री नसते. त्यामुळे पांडे यांना कदाचित अन्य कुठलाही मतदारसंघ दिला जाऊ शकेल.
भाजपच्या सर्वेक्षणात भारती लव्हेकर यांच्याबद्दल नकारात्मक निकाल आल्याने यावेळी लव्हेकर यांना उमेदवारी नाकारली जाईल अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली. या जागेसाठी मोहित कंबोज हे प्रयत्न करत असल्याचीही माहिती या सूत्राने दिली. तसे झाले तर काँग्रेसचे संजय पांडे विरुद्ध मोहित कंबोज अशी लढत होऊ शकेल. पांडे यांच्या विरोधात लव्हेकर यांनाच तिकीट दिले तर भाजप ही जागा १०० टक्के गमावेल, असे भाजपच्या या नेत्याने सांगितले.
दरम्यान, संजय पांडे यांना केंद्रीय तपास यंत्रणेने (Central Agency) २०२२ मध्ये अटक केली होती. नॅशनल स्टॉक एक्सचेंज प्रकरणात फोन टॅपिंग करण्याचे काम पांडे यांच्या कंपनीला देण्यात आल्याचा ठपका पांडे यांच्यावर ठेवण्यात आला होता. हि केसच चुकीची होती आणि पांडे यांना खोट्या प्रकरणात अटक करण्यात आली होती, असा दावा काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला. पांडे यांच्या कंपनीला हे काम मिळाले तेव्हा पांडे पदावर नव्हते, याकडे सावंत यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, संजय पांडे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय जनहित पार्टी (Rashtriya Janhit Party) या राजकीय पक्ष स्थापनेची घोषणा केली होती. अद्याप या पक्षाला निवडणूक आयोगाची (ECI) मान्यता मिळाली नसली तरी निवडणूक आचारसंहिता (Election Code of Conduct) लागू होण्यापूर्वी पक्षाला मान्यता मिळेल, असा दावा पांडे यांच्या पक्षाशी संबधित नेत्याने केला. याच नवीन पक्षाच्या नावांवर पांडे यांचे किमान चार समर्थक उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे समजते. यातील बहुतेक सगळे उमेदवार सनदी अधिकारी किंवा पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.