X: @therajkaran
मुंबई: लोकसभा निवडणूकीत महायुतीचे १७ आणि महाविकास आघाडीचे ३१ उमेदवार निवडून आले. पण आम्ही कधी मतपत्रिकेवर मतदान मागितले नाही. आमच्या काळात आधीही आमच्यावर आरोप होत होते. आता निर्जीव इएमव्हीवर होत आहेत, अशी टोलेबाजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदनपर प्रस्तावावर बोलताना केली.
आपण आम्हाला न्याय दिलात आणि जनतेनेही मतदानात तोच निर्णय दिला, असेही शिंदे म्हणाले. असे हे अध्यक्ष म्हणजे सभागृहाचा साक्षात ‘कोहिनूर’ आहेत या शब्दांत गौरव केला.
ते म्हणाले, अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना हवेहवेसे व्यक्तिमत्त्व. सभागृहात प्रत्येक सदस्याला समान न्याय आणि समान वागणूक देतात. सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा त्यांना मान मिळाला आहे. विधीमंडळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीले जाईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावेळी आपल्या शैलीत विरोधी पक्षाला शाब्दिक चिमटे घेतले. लोकसभा निवडणूक निकालानंतर इव्हिएम म्हणजे गार गार वाटत होते. मग आता असं का? आम्हाला लाडक्या बहिणींनी येथे बसवले आहे, आपला करेक्ट कार्यक्रम झाला हे आता तरी मान्य करा! राहुल नार्वेकर यांनी संयम न सोडता सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही बाजूचा अभ्यास करून न्याय दिला. अध्यक्षपदी निवड झाली याबद्दल मन: पूर्वक अभिनंदन, असे अजित पवार म्हणाले.