महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूरजवळील कशेडी घाटात खैर लाकडांची वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. या कारवाईत अंदाजे १ लाख रुपयांची खैर लाकडे आणि सुमारे ९ लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले आहे.
वन विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारच्या सुमारास कशेडी घाटातील वन विभागाच्या तपासणी नाक्यावर एमएच-०८-६७९४ क्रमांकाचे पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चालकाने वाहन न थांबवता वेगाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले.
तपासणीदरम्यान वाहनामध्ये खैराची लाकडे आढळून आली. प्राथमिक चौकशीत ही लाकडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वेल्हे परिसरातून रत्नागिरी जिल्ह्याकडे नेली जात असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी शुभम मोरे (रा. घोडेगाव, ता. चिपळूण) आणि अजित मोरे (रा. जेजुरी, पुणे) यांच्याविरोधात वन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
रोहा येथील उपवनसंरक्षक डॉ. शैलेंद्रकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेडगे, महाडचे वनक्षेत्रपाल आशिष पाटील तसेच वनपाल तेजस नरे, आदेश जाधव, संदीप उतेकर आणि सचिन मेने यांनी ही कारवाई केली.
जप्त करण्यात आलेले वाहन आणि खैर लाकडे वन विभागाच्या ताब्यात असून ते माणगाव येथील वन विभागाच्या डेपोमध्ये जमा करण्यात आले आहेत. पुढील तपास वनक्षेत्रपाल आशिष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

