मुंबई : शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय निरुपम यांनी गुरुवारी उद्धव ठाकरे गटातील खासदारांच्या कथित हालचालींवर प्रतिक्रिया देताना, पक्षातील असंतोष आणि नेतृत्वावरील विश्वास कमी होणे हीच अशा घडामोडींची मुख्य कारणे असल्याचा दावा केला.
पत्रकारांशी संवाद साधताना निरुपम म्हणाले की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील नऊपैकी सहा खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र सादर केल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडींना कोणत्याही राजकीय कटकारस्थानाशी जोडण्याऐवजी पक्षातील वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या संसद अधिवेशन सुरू नसताना जारी करण्यात आलेल्या तथाकथित व्हीपला कोणताही कायदेशीर आधार नसल्याचा दावाही त्यांनी केला. संसदीय परंपरेनुसार व्हीप हा केवळ संसदीय कामकाजाच्या संदर्भात लागू होत असल्याने खासदारांवर कारवाईची भाषा करणे दिशाभूल करणारे असल्याचे ते म्हणाले.
पक्ष नेतृत्वावर टीका करताना निरुपम यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद तुटल्यास असंतोष वाढणे स्वाभाविक आहे. नेतृत्वाने कार्यकर्त्यांपासून दुरावा निर्माण केल्यास लोकप्रतिनिधी स्वतःच्या राजकीय भवितव्याचा विचार करू लागतात, असे त्यांनी म्हटले.
“पक्षाची ताकद केवळ नावात नसते, तर कार्यकर्त्यांच्या विश्वासात असते. तो विश्वास ढासळला की पक्षातील अस्वस्थता उघडपणे दिसू लागते,” असे निरुपम म्हणाले.
संजय राऊत यांच्या अलीकडील वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी दोन दिवसांपूर्वी ज्यांच्याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली जात होती, त्यांच्यावरच आता टीका होत असल्याचे सांगितले. अशा बदलत्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला.
‘ऑपरेशन टायगर’ या चर्चित शब्दप्रयोगाबाबत बोलताना निरुपम यांनी शिवसेना कोणतेही असे अभियान राबवत नसल्याचे स्पष्ट केले. हा शब्दप्रयोग माध्यमांमधून प्रचलित झाला असून, शिवसेना कोणालाही जबरदस्तीने पक्षात आणण्यावर विश्वास ठेवत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र राज्यभरातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी स्वेच्छेने शिवसेनेत प्रवेश करत असल्याचा दावाही त्यांनी केला.
२०२२ नंतर उद्धव ठाकरे गटातील अनेक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी शिवसेनेत प्रवेश केला असून, त्यामागे विकासाभिमुख नेतृत्वावर असलेला विश्वास हे प्रमुख कारण असल्याचे निरुपम यांनी नमूद केले.
महाराष्ट्रातील जनतेला संघर्ष नव्हे तर स्थैर्य, विकास आणि सक्षम नेतृत्व हवे आहे. कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद साधणाऱ्या नेतृत्वामागेच जनतेचा आणि लोकप्रतिनिधींचा पाठिंबा उभा राहतो, असेही त्यांनी सांगितले.

