महाराष्ट्र ताज्या बातम्या

कर्जमाफीवरून विधानसभेत खडाजंगी; ‘शेतकऱ्यांना मामा बनवणाऱ्या सरकारचा धिक्कार’ म्हणत विरोधकांचा सभात्याग

Maharashtra Agriculture Minister Dattatray Bharane addressing the Legislative Assembly while replying to a discussion on farmers’ welfare, loan waiver and agricultural schemes.

मुंबई  : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून “शेतकरी सुखी तर महाराष्ट्र समृद्ध” हेच शासनाचे ब्रीद असल्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत स्पष्ट केले. मात्र सरसकट कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधी पक्ष सदस्य असमाधानी राहिले आणि घोषणाबाजी करत सभात्याग केला.

नियम २९३ अंतर्गत सत्ताधारी सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना कृषीमंत्री भरणे म्हणाले की, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपण स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींची शासनाला पूर्ण जाणीव आहे.

भरणे म्हणाले की, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा पहिल्या टप्प्यात ८० टक्के शेतकऱ्यांना लाभ झाला. दुसरा टप्पा २१ जिल्ह्यांत राबविण्यात आला असून यामध्ये सुमारे ६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या योजनेत समाविष्ट नसलेल्या गावांसाठी स्वतंत्र नवीन कृषी संजीवनी योजना आणली जाणार असून त्यासाठी रिझर्व्ह बँकेचे सहकार्य घेतले जाणार आहे.

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन योजनेअंतर्गत २,१६१ कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्यात आले असून सुमारे ७ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. राज्यात ४५ हजार मेट्रिक टन कांदा साठवण क्षमता निर्माण करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्यातील फार्मर आयडी कार्ड योजनेचा लाभ आतापर्यंत ३४ लाख शेतकऱ्यांनी घेतला आहे. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख आणि अधिकार मिळावेत यासाठी लवकरच महिला सक्षमीकरण विधेयक आणले जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री बळिराजा योजनेअंतर्गत पाणंद रस्त्यांची निर्मिती सुरू असल्याचे सांगत कृषी सल्ला देणाऱ्या मोबाईल ॲपवर आतापर्यंत १ कोटी ५६ लाख कॉल्स प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.

भरणे म्हणाले की, राज्यासमोर अनेक आर्थिक आव्हाने असतानाही सरकारने कर्जमाफी दिली आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मात्र विरोधी पक्ष सदस्यांनी कृषीमंत्र्यांच्या उत्तरावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सरसकट कर्जमाफीबाबत स्पष्ट भूमिका न घेतल्याचा आरोप करत विरोधकांनी “शेतकऱ्यांना मामा बनवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो” अशा घोषणा दिल्या आणि अखेर सभागृहातून सभात्याग केला.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात