मुंबई : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून “शेतकरी सुखी तर महाराष्ट्र समृद्ध” हेच शासनाचे ब्रीद असल्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत स्पष्ट केले. मात्र सरसकट कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधी पक्ष सदस्य असमाधानी राहिले आणि घोषणाबाजी करत सभात्याग केला.
नियम २९३ अंतर्गत सत्ताधारी सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना कृषीमंत्री भरणे म्हणाले की, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपण स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींची शासनाला पूर्ण जाणीव आहे.
भरणे म्हणाले की, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा पहिल्या टप्प्यात ८० टक्के शेतकऱ्यांना लाभ झाला. दुसरा टप्पा २१ जिल्ह्यांत राबविण्यात आला असून यामध्ये सुमारे ६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या योजनेत समाविष्ट नसलेल्या गावांसाठी स्वतंत्र नवीन कृषी संजीवनी योजना आणली जाणार असून त्यासाठी रिझर्व्ह बँकेचे सहकार्य घेतले जाणार आहे.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन योजनेअंतर्गत २,१६१ कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्यात आले असून सुमारे ७ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. राज्यात ४५ हजार मेट्रिक टन कांदा साठवण क्षमता निर्माण करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्यातील फार्मर आयडी कार्ड योजनेचा लाभ आतापर्यंत ३४ लाख शेतकऱ्यांनी घेतला आहे. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख आणि अधिकार मिळावेत यासाठी लवकरच महिला सक्षमीकरण विधेयक आणले जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
मुख्यमंत्री बळिराजा योजनेअंतर्गत पाणंद रस्त्यांची निर्मिती सुरू असल्याचे सांगत कृषी सल्ला देणाऱ्या मोबाईल ॲपवर आतापर्यंत १ कोटी ५६ लाख कॉल्स प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.
भरणे म्हणाले की, राज्यासमोर अनेक आर्थिक आव्हाने असतानाही सरकारने कर्जमाफी दिली आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मात्र विरोधी पक्ष सदस्यांनी कृषीमंत्र्यांच्या उत्तरावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सरसकट कर्जमाफीबाबत स्पष्ट भूमिका न घेतल्याचा आरोप करत विरोधकांनी “शेतकऱ्यांना मामा बनवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो” अशा घोषणा दिल्या आणि अखेर सभागृहातून सभात्याग केला.

