महाराष्ट्र ताज्या बातम्या

अतिवृष्टीमुळे राज्यात ६३ बळी; कृपया या विषयाचे राजकारण करू नका : गिरीश महाजन

मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन विधानसभेत महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि आपत्ती व्यवस्थापनावर उत्तर देताना

मुंबई : मुंबई, पालघर, पुणे, नाशिक आणि राज्यातील इतर भागांत झालेली अतिवृष्टी ही राज्यावरील मोठी आपत्ती आहे. चार दिवसांतील विक्रमी पावसामुळे आतापर्यंत विविध कारणांनी ६३ जणांचा बळी गेला आहे. जनता संकटात आहे, त्यामुळे कृपया या विषयाचे राजकारण होऊ नये, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी विधानसभेत केले.

अतिवृष्टी आणि आपत्ती व्यवस्थापनावरील अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना महाजन बोलत होते.

“मी आताच पुण्याहून आलो आहे. दीड दिवसांत ६३५ मिमी पाऊस झाला. १९८२ पासूनचा कचरा डेपो होता. तो इमारतीवर कोसळला. त्या ढिगाऱ्याखाली २३ लोक अडकले होते. त्यापैकी ११ जणांना बाहेर काढण्यात आले असून सहा जण जखमी आहेत. आत अडकलेले लोक काही तासांपासून ढिगाऱ्याखाली आहेत; ते सुरक्षित असतील का, हे सांगणे कठीण आहे,” अशी माहिती महाजन यांनी दिली.

काही जिल्ह्यांमध्ये आजही पुरेसा पाऊस नाही; मात्र ज्या भागांत पाऊस झाला, तेथे अल निनोच्या सूचनांनंतरही अतिवृष्टीची तीव्रता प्रचंड होती, असे ते म्हणाले. काही ठिकाणी ४०० ते ४५० मिमी पाऊस, वादळी वारे आणि समुद्राला भरती अशी परिस्थिती निर्माण झाली. समुद्राचे पाणीही किनाऱ्याकडे येत असल्याने संकट अधिक गंभीर झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

“हे संकट मोठे आहे. पाणी उतरावे लागेल. ज्या ज्या ठिकाणी पाऊस होत आहे, त्या ठिकाणी आम्ही धावून जात आहोत. शासन कुठेही कमी पडत नाही,” असे महाजन यांनी स्पष्ट केले.

अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. पालघर जिल्ह्यात स्थिती गंभीर असून तेथे मोबाइल नेटवर्कची मोठी अडचण आहे. संबंधित कंपन्यांशी चर्चा केली असून त्यांच्या यंत्रणा पाण्याखाली गेल्याने नेटवर्क सुरू होण्यात अडथळे येत असल्याचे महाजन यांनी सांगितले.

धोकादायक ठिकाणांवरील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून त्यांना अन्नधान्याचे किट देण्यात आले आहेत. या अतिवृष्टीकाळात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. सभागृहाने निर्णय घेतल्यास अधिक मदतही देता येईल, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

मिसिंग लिंकवरील दरड कोसळण्याच्या घटनेबाबत बोलताना महाजन म्हणाले की, “लिंकला कोणताही धोका निर्माण झालेला नाही. या आपत्तीच्या काळात लोकांना शक्य ती सर्व मदत केली जाईल.”

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात