२४×७ वैद्यकीय सेवा, समर्पित रुग्णवाहिका, हेल्पलाइन आणि रुग्णालयाशी MOU करण्याची मागणी
मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई येथील विद्यार्थी डॉ. जनार्दनन पी. यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षा आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधांबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मुंबईने प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केले आहेत. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आणि काही विद्यार्थ्यांनी TISS मुंबई कॅम्पसबाहेर निदर्शने करून प्रशासनाला निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर रुग्णवाहिका आणि आवश्यक वैद्यकीय मदत मिळण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
अभाविपने कॅम्पसमध्ये २४×७ आपत्कालीन वैद्यकीय सेवा, समर्पित रुग्णवाहिका आणि बॅकअप रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी स्पष्ट Standard Operating Procedure (SOP) आणि स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्यात यावी, असेही संघटनेने म्हटले आहे. BARC Hospital किंवा जवळच्या सुपर-स्पेशालिटी रुग्णालयाशी करार करून विद्यार्थ्यांना तातडीने उपचार मिळण्याची व्यवस्था करावी, प्रत्येक विद्यार्थ्याला आरोग्य आणि अपघात विमा संरक्षण द्यावे आणि TISS हेल्थ सेंटरमध्ये पुरेसे डॉक्टर, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी, आवश्यक औषधे व आपत्कालीन उपकरणे उपलब्ध करून द्यावीत, अशा मागण्या अभाविपने केल्या आहेत.
अभाविप मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार म्हणाले, “डॉ. जनार्दनन पी. यांच्या दुर्दैवी मृत्यूने विद्यार्थी समुदायाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर TISS प्रशासनाने कॅम्पसमधील आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेचा गांभीर्याने आढावा घेणे आवश्यक आहे.” “विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, वैद्यकीय मदत आणि योग्य रुग्णालयात तातडीने उपचार मिळणे ही मूलभूत आवश्यकता आहे. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता ठोस आणि कालबद्ध कार्यवाही करावी,” असे पवार म्हणाले. अभाविपने या मागण्यांवर १० दिवसांच्या आत दृश्यमान आणि समाधानकारक कार्यवाही करण्याची मागणी केली असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेच्या प्रश्नावर तडजोड केली जाणार नसल्याचे म्हटले आहे.
TISS प्रशासनाची या आरोपांवर किंवा मागण्यांवर अधिकृत प्रतिक्रिया उपलब्ध झाल्यास ती वृत्तात समाविष्ट करण्यात येईल.

