मुंबई महाराष्ट्र

मराठा आंदोलकांवर लाठीमार; राजकीय बळी कोणाचा जाणार?

Twitter : @milindmane70

मुंबई

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी उपोषणाला बसलेल्या मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या पोलिसी लाठीमारानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. नागपुरात घडलेल्या गोवारी हत्याकांडात तत्कालीन आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचे मंत्रिपद गेले होते. त्याचप्रमाणे आता जालन्यातील प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांपैकी कुणाचा राजकीय बळी दिला जाणार? अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होते. उपोषणा दरम्यान पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी पोलीस घेऊन जात होते. त्यावेळी आंदोलकांनी पोलिसांशी हुज्जत घालून जरांगे पाटील यांना रुग्णालयात घेऊन जाण्यास प्रतिकार करून पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप केला जात आहे. यात काही पोलीस जखमी झाले, त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीहल्ला केल्याने यात आंदोलक जखमी झाले असून अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी केवळ लाठीहल्लाच नाहीतर हवेत गोळीबार केला, याप्रकरणी 16 आरोपींसह तीनशे ते साडेतीनशे आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत यांच्या फिर्यादीवरून ऋषिकेश बेंद्रे, श्रीराम कुरणकर, संभाजी बेंद्रे, महारुद्र अंबरुळे, राजेंद्र कुटुंबे, भागवत तारक, दादा घाडगे, पांडुरंग तारक, अमोल पंडित, किरण तारक, अमोल लहाने, वैभव आवटे, किशोर कटारे, अविनाश मांगदरे, मयूर आवटे यांच्यासह तीनशे ते साडेतीनशे आंदोलकांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 307, 333 ,332, 353, 427, 435,120 (ब),143,147,148,149, मुंबई पोलीस कायद्याचे कलम 135 आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम तीन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे करीत आहेत.

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहित पवार, भाजपाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार छत्रपती संभाजी राजे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घटनास्थळाला भेटी दिल्या, जखमी आंदोलकांची भेट घेतली. या घटनेमुळे राज्यातील सगळ्या जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. गाव पातळीपासून शहर पातळीपर्यंत सर्वत्र बैठकांचे आयोजन केले जात आहे. राज्यातील अनेक भागात जाळपोळ सुरू आहे. मात्र राज्यातील मंत्रिमंडळातील एकही मंत्री सद्यस्थितीत जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात जाण्यास तयार नसल्याची दिसते आहे. यामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणावर संतप्त झाला आहे.

राज ठाकरे म्हणाले शासन प्रशासन जबाबदार

या प्रकरणावरून राज्यातील कोणत्या नेत्याचा राजकीय बळी जाणार याचीदेखील चर्चा राज्य सरकारमधील मंत्र्यांपासून विरोधी पक्षातील नेत्यांपासून सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चिली जाऊ लागली आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलने केली, त्या आंदोलनाचा इतिहास बघितला तर आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल टाकले नसेल. यामुळे इथे सरकारच चुकले आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. जे घडले, त्याला गेल्या वीस वर्षात महाराष्ट्राचे विस्कटलेलं राजकारण जबाबदार असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले की जालन्यातील घटना अतिशय दुर्दैवी असून या घटनेचा निषेध मी नोंदवीत आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलन केली त्या आंदोलनाचा इतिहास बघितला तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणालो आहे की मराठा समाजाच्या आंदोलनाचा आदर्श जगाने घ्यावा, इतकी शांततेत आणि समंजसपणाने झाली होती. ही पार्श्वभूमी असताना जालन्यात काल असं काय घडणार होतं की प्रशासनाने असे टोकाचं पाऊल उचललं? याची माहिती पोलिसांच्या चौकशीतून बाहेर येईल. पण मी खात्रीने सांगतो की पूर्वइतिहास बघता आंदोलनाकांनी कोणतही चुकीचं पाऊल टाकलं नसेल, यामुळे इथे सरकारच चुकलं हे निश्चित आहे.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, जालन्याच्या आंदोलनाला प्रशासन आणि सध्याची राजकीय परिस्थिती जबाबदार आहे. जालन्यात काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे, पण ते ज्या कारणाने घडलं त्याला गेल्या वीस वर्षात महाराष्ट्राचे विस्कटलेलं राजकारण जबाबदार आहे. सरकार पाडून दुसऱ्याचे सरकार सत्तेत आणणं, यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती, ती आता मिटली असेल, असे मला वाटते, त्यामुळे आता दोषारोप नको, तर कृती अपेक्षित आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये मराठा समाजाला कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. राज ठाकरे म्हणाले की, माजी मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे, या घटनेचे पडसाद इतरत्र उमटू देऊ नका. तुम्ही आंदोलन आणि मोर्चाचा आदर्श घालून दिला आहे, तो खरच वाखाणण्यासारखा आहे. तुमचा राग समजू शकतो, पण तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही, याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. मराठा माणसाची आक्रोशातून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही आंदोलनाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत उभी राहिली आहे आणि यापुढेही उभी राहील.

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही – शरद पवार

ही घटना निंदनीय असून याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला. शिंदे -फडणवीस -पवार सरकारने शब्द पाळला नसल्याने पुन्हा आंदोलन करण्याची वेळ मराठा समाजावर आल्याचे म्हणत पवार यांनी पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या ठिकाणी भेट दिली.

शरद पवार म्हणाले, यात ८० ते ९० आंदोलक जखमी झाले आहेत. या आंदोलनाशी काही संबंध नसणाऱ्यांनाही पोलिसांच्या लाठीहल्ल्याचा याचा मार खावा लागला. यानंतर अज्ञात 350 ते 400 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. येथे कारण नसतानाही पोलिसांचा मोठा फौज फाटा आणला गेला, यातून पुढे शांततेच्या मार्गाने संघर्ष करू, असा इशारा पवारांनी दिला.

सरकारने फक्त आश्वासन दिली पण त्याची पूर्तता केली नसल्याचा आरोपी पवारांनी केला. ते म्हणाले, यापूर्वी मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने आंदोलने केली. मात्र असे प्रकार घडले नाहीत. मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही, शब्द पाळला नसल्यानेच आंदोलन करण्यात आले. एका बाजूला चर्चा सुरू ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला लाठी हल्ला करायचा, आंदोलन दाबण्यासाठी सरकारने दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पवारांनी केला.

आम्ही आंदोलकांसोबत – अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आपण मराठा आंदोलकांसोबत आहोत. लाठीचार्ज करणारे पोलीस दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. त्यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे. अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मराठी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी रास्त व न्यायाची आहे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे किंवा राज्यात कुठेही होणाऱ्या शांततामय आंदोलनाला आमचा राज्यातील नागरिकांचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाचा लढा रस्त्यावर आणि न्यायालयात ही तितक्यात ताकतीने लढण्याची आपली सगळ्यांची भूमिका आहे, त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आणि सामूहिक प्रयत्न गरजेचे आहे, यावरच आंदोलनाचे यश अवलंबून आहे असे अजित पवार म्हणाले.

मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास मी राज्यातील नागरिकांना देत असल्याचे अजित पवार म्हणाले.

राज्यातील मराठा आंदोलनाने लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा आदर्श निर्माण केला आहे. हा आदर्श आणि गौरवशाली परंपरा कायम ठेवून कायदा सुव्यवस्था कायम राखत लोकशाही मार्गानेच हे आंदोलन पुढे जाईल, याची काळजी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल, असेही अजित पवार म्हणाले.

राज्य शासन आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जण मराठा आंदोलकांच्यासोबत आहे, असा विश्वास मी देतो. अंबड येथील घटनेतील सहभागी पोलिसांवर निश्चित कारवाई करण्यात येईल, कुणालाही पाठीशी घातली जाणार नाही. राज्यात परिस्थिती बिघडणार नाही, शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन मराठा आंदोलन आणि राज्यातील नागरिकांना आहे असे अजित पवार यांनी आपल्या ट्विटर मध्ये म्हटले आहे.

अन्याय होतो तेव्हाच उद्रेक होतो – उदयनराजे भोसले

जालन्यात मराठा समाजबांधवांवर लाठीहल्ला करणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी तातडीने करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. उदयनराजे यांनी उपोषणकर्त्यांची आणि लाठीहल्ल्यात जखमी झालेल्यांची आज भेट घेतली. या भेटीनंतर उदयनराजे माध्यमांशी बोलत होते.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या समाज बांधवांवर जो हल्ला झाला त्याचा मी जाहीर निषेध करतो. शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांवर लाठी हल्ला करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, जे आंदोलक पोलिसांच्या लाठी हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्या उपचाराची सर्व जबाबदारी सरकारने घ्यावी. तसेच लाठीहल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी.

राज्यातील प्रत्येक मराठा व्यक्तीच्या मनात हीच इच्छा आहे की इतर जाती-जमातीतील लोकांना न्याय मिळत असेल तर मग मराठा समाजाला न्याय का नाही? खरं तर हे फार पूर्वीच व्हायला पाहिजे होते, पण का झाले नाही हे मला माहीत नाही. ज्यावेळी कुठल्याही समाजावर अन्याय होतो, तेव्हा उद्रेक होणे स्वाभाविक आहे, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.

उदयनराजे यांनी सांगितले की आरक्षणासंदर्भातले आपले आंदोलन हे शांततेच्या मार्गाने चालू ठेवावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याशी कालच माझी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा झाली आहे. येत्या दोन- तीन दिवसात तुमच्या मागण्या त्यांच्या कानावर मी घालेल, तसेच आंदोलनकर्त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची व उपमुख्यमंत्री यांची भेट घालून दिली जाईल, असे उदयनराजे यांनी आंदोलनकर्त्यांशी भेट घेतल्यानंतर माध्यमांसमोर बोलताना सांगितले.

जालना जिल्ह्यातील घटनेनंतर राज्यातील सर्व जिल्ह्यात मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाला आहे. येत्या दोन-चार दिवसात राज्यात मोठ्या प्रमाणावर मराठा समाज आक्रमक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील राजकीय घडामोडींबरोबरच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्यानंतर यामध्ये बळी कोणाचा देणार? शिंदेंचा की फडणवीसांचा हे  येत्या काही दिवसातच समजेल, असा दावा केला जात आहे.

Milind Mane

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात