X: @therajkaran
मुंबई: सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा भाजपाचा दुपट्टा घालतो तेव्हा तो कार्यकर्ता होतो. सुपर वॉरियर्सच्या गळ्यात असलेला भाजपाचा दुपट्टा हा हीच त्यांची ओळख आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. कार्यकर्त्यांनी आपला सन्मान व या दुपट्ट्याची शान राखण्यासाठी पक्षकार्य करताना निवडणुकीत विजयासाठी प्रयत्न करावे.
मुंबई शहरातील मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा क्षेत्रातील बूथ प्रमुख म्हणजे, सुपर वॉरियर्ससोबत त्यांनी बुधवारी संवाद साधला. त्यांच्या या प्रवासात भाजपा मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार, खा. पूनम महाजन, आमदार अमित साटम, विद्याताई ठाकूर, भारती लव्हेकर, पराग अळवणी, राजहंससिंह, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, जयप्रकाश ठाकूर, मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांच्यासह संबंधित मतदारसंघातील आमदार व पदाधिकारी सोबत होते. सर्वसामान्य कार्यकर्ता देशातील सर्वोच्च पदापर्यंत पोहचण्याची किमया केवळ भाजपामध्येच शक्य आहे, असे आवाहन करून बावनकुळे म्हणाले की, लोकसभेपाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुका शिंदे-फडणवीस व अजितदादांच्या नेतृत्त्वात लढविणार आहोत. भाजपासह राज्यातील महायुतीला केवळ विजय नव्हे तर महाविजय साकारायचा आहे. मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या योजना अंतिम व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी तेरा महिने दररोज तीन तास संपर्क करावा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.
मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या कामांवर विश्वास ठेवून जनता महाराष्ट्रात महायुतीचे ४५ प्लस खासदार, २२५ प्लस आमदार निवडून येतील, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. देशात ४००हून अधिक एनडीएचे खासदार निवडून येतील. ५१ टक्के मते आपल्याला मिळविण्यासाठी सतत जागे राहावे, असे आवाहन त्यांनी सुपर वॉरियर्ससह पदाधिकाऱ्यांना केले.
दिवसभर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सकाळी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील गोरेगांव, दिंडोशी आणि वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर दुपारी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील बांद्रा (प), बांद्रा (पू) आणि विलेपार्ले विधानसभा क्षेत्रातील आणि कलिना, कुर्ला आणि चांदिवाली या सर्व विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
चार अमृतस्तंभ विकासाचा कणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेच्या अढळ विश्वासासह स्त्रीशक्ती, युवाशक्ती, शेतकरी आणि गरीब कुटुंबे या चार अमृतस्तंभाचा होणारा शाश्वत विकास हाच भारताचा कणा असेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला
६०० घरापर्यंत पोहचा
राज्यातील सर्व प्रमुख नेते त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील ६०० घरापर्यंत पोहचून मोदी सरकारच्या योजनांची माहिती देणार आहेत. कुणीही मोदी सरकारच्या योजनांपासून वंचित राहू नये याकडे जातीने लक्ष घालावे, असेही आवाहन बावनकुळे यांनी केले.
Also Read: हा निर्णय ‘अमूल’ला राज्यात पायघड्या घालणारा : किसान सभा