मुंबई
ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाइव्हदरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली. काही दिवसांपूर्वी भाजप आमदाराने पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केला होता. या घटनांवरुन विरोधी पक्षाकडून गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून महाराष्ट्राचा बिहार झाल्याच घणाघात विरोधकांकडून केला जात आहे.
दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत यावर स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, विनोद घोसाळकर आणि मॉरिस दोघेही एकत्र काम करीत असल्याचं एकत्र पोस्टर वरुन लक्षत येत आहे. बऱ्याच गोष्टी पोलिसांच्या लक्षात आलेल्या आहेत. त्या योग्य वेळी जाहीर करण्यात येतील. ही घटना गंभीर आहे. अशा घटनांचं राजकारण करणं योग्य नाही. वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडली असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
बंदूकांच्या परवाना देण्यासंदर्भात काही खबरदारी घ्यायला हवी याचाही विचार सुरू आहे. यासंदर्भतील आदेश देण्यात आले आहेत. विरोधकांकडून मात्र याचं राजकारण केलं जात आहे. गाडीखाली श्वानाचा मृत्यू झाला तरी विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतात, असंही ते यावेळी म्हणाले.
 
								 
                                 
                         
                            
