मुंबई
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर महाराष्ट्र काँग्रेसने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथल यांनी संताप व्यक्त केला.
अशोक चव्हाणांनंतर एकही व्यक्ती काँग्रेस सोडून जाणार नाही. काँग्रेस सोडल्यानंतर त्यांना जनताही स्वीकारणार नाही. अशोक चव्हाणांनी काँग्रेस का सोडलं, याचं त्यांच्याकडे काहीच कारण नाही. काँग्रेसची नीती चुकीची आहे का, काँग्रेसने त्यांच्यावर अन्याय केला आहे का? त्यांना पक्षाने दोनदा मुख्यमंत्री केलं. १५ वर्षे मंत्रिपद दिलं. परवा दुपारी तीन वाजेपर्यंत ते आमच्यासोबत बैठकीत होते.
चेन्नीथल पुढे म्हणाले, ते दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटले होते. तसेच दिल्लीतील आमच्या काही नेत्यांना भेटले होते. तिथून ते परत आले. राजकारणात आयाराम-गयारामांना महत्त्व नसतं. त्यांच्यावर ईडीचा दबाव होता का? हे त्यांनी सांगायला हवं होतं.
ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत, त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजपने दरवाजा उघडा ठेवला आहे. अजित पवारांवर 70 हजार कोटींचा आरोप लावला. पक्ष बदलला ते पूर्ण स्वच्छ झाले. भाजप वॉशिंग मशिन आहे का? या देशात ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्यांना आपल्या पक्षात घेत आहेत. मग त्यांच्यावरील आरोप खोटे ठरतात”, अशी टीका रमेश चेन्नीथला यांनी केली.
नाना पटोले म्हणाले, अशोक चव्हाणांनी परत यावं..
मी अशोक चव्हाणांना ओळखतो, त्यांना नेतृत्व करायची सवय आहे. भाजपमध्ये त्यांना ती संधी मिळणार नाही, हे मी अनुभवाने सांगतोय. अजूनही संधी गेलेली नाही त्यांनी परत काँग्रेसमध्ये यावं.