मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी ते काय घोषणा करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे. आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक नकली बंदुका घेऊन दाखल झाले. यावेळी त्यांनी घोषणाबाजी केली. ‘गेली शिवशाही आली गुंडशाही’ घोषणाबाजी विरोधकांकडून केली जात होती. गेल्या काही दिवसात राज्यात घडलेल्या गोळीबाराच्या घटनांवर बोट ठेवत विरोधकांनी संताप व्यक्त केला. हातात नकली बंदुका घेऊन विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
आजच्या अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा…
या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार विशेष घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये पायाभूत सुविधा, शेतकऱ्यांसाठी योजना, पिक विमा, घरकूल योजना, रस्ते, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रातील घोषणांचा समावेश आहे.
काल सभागृहात सादर झालेल्या ८ हजार ६०९.१७ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांपैकी ५ हजार ६६५.४८ कोटींच्या अनिवार्य, २ हजार ९४६.६९ कोटींच्या मागण्या या विविध उपक्रमांतर्गत आणि १७ कोटींच्या रक्कम केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध होण्यासंदर्भात आहेत. ८ हजार ६०९.१७ कोटींच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या, तरी या मागण्यांचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा 6 हजार 591.45 कोटी रुपये इतका आहे. हा निव्वळ भार सहन करण्यासाठी कोणतीही अतिरिक्त साधनसंपत्ती तूर्तास उपलब्ध नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.