मुंबई – मुंबई परिसरातील सहा लोकसभा जागांपैकी पाच जागा लढवण्याच्या हालचाली भाजपातून सुरु झाल्याचं दिसतंय. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्याचा भआजाचा प्रयत्न आहे. यासाठी मुंबईतील सहापैकी पाच खासदार भाजपाचे असावेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेला केवळ एकच जागा सोडण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येतंय.
कोणत्या मतदारसंघांमधून भाजपा इच्छुक?
सध्या मुंबईत भाजपाचे तीन खासदार आहेत. त्यात उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी, उत्तर मध्य मतदारसंघातून पूनम महाजन आणि इशान्य मुंबईतून मनोज कोटक हे खासदार आहेत. मात्र या तीन मतदारसंघांसोबतच दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम या दोन जागाही भाजपाच्या पारड्यात याव्यात, यासाठी प्रयत्न असल्याचं सांगण्यात येतंय.
शिंदेंच्या शिवसेनेकडे एकच जागा राहणार?
शिवसेनेच्या २०१९च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई अशा तीन जागा निवडून आल्या होत्या. त्यातील दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत हे सध्या ठाकरे शिवसेनेत आहेत. ही जागा भाजपाला हवी आहे. त्यामुळेच शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेल्या मिलिंद देवरा यांना राज्यसभेवर पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. दक्षिण मुंबईतून भाजपाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निवडणूक रिंगणात दिसण्याची शक्यता आहे.
तर दक्षिण मध्य मुंबई ही एकमेव जागा शिंदे शिवसेनेकडे राहण्याची शक्यता आहे. सध्या या मतदारसंघातून राहुल शेवाळे हे खासदार आहेत. त्यांनाच शिंदे शिवसेना पुन्हा उमेदवारी देईल असं सांगण्यात येतंय.
शिंदे शिवसेना ही तीन लोकसभा जागांसाठी आग्रही आहे. त्यात २०१९ च्या जिंकलेल्या तिन्ही जागांचा समावेश आहे.
उत्तर पश्चिमवरुन होणार संघर्ष
गजानन किर्तीकर खासदार असलेल्या मुंबई उत्त्रर-पश्चिम मतदारससंघावरुन संघर्ष होण्याची शक्यता आहे. या जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून गजानन किर्तीकर विरुद्ध त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर असा संघर्ष रंगण्याची शक्यता होती. मात्र ही जागा भाजपानं मागितली तर त्या जागेवरुन पूनम महाजन यांना संधी देण्यात येईल का, अशी चर्चा सुरुये.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी दिली जाईल, असं सांगण्यात येतंय.