मुंबई – आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची चर्चा सध्या सुरु आहे. यातच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय. ही चर्चा सुरु असताना उद्धव ठाकरे गप्प का, असा सवाल केसरकर यांनी केलाय. उद्धव ठाकरे भाजपाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. यातूनच आदित्य यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्याच्या चर्चा रंगतायेत. याचाच दाखला देत यावर उद्धव ठाकरे गप्प का, असा सवाल केसरकरांनी केलाय.
शिवसैनिकांनो आता तरी डोळे उघडा- केसरकर
उद्धव ठाकरेंकडून या भेटीचं खंडन केलेलं नाही. त्यामुळे मविआत असलेल्या पक्षांची गॅरंटी नसल्याचं केसरकर म्हणतायेत. प्रकाश आंबेडकर यांनी मविआत येण्यापूर्वी भाजपासोबत जाणार नाही, असं लिखित पत्र ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे मागितलेलं आहे. त्यामुळं या नेत्यांचीच गॅरंटी नसल्याचं केसरकर म्हणतायेत. आता तरी शिवसैनिकांनी डोळे उघडण्याची गरज असल्याचं केसरकर म्हणालेत.
भेटले असतील तर पुरावे द्या
जर केसरकर म्हणत असतील तसं आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी पंतप्रधानांची भेट घेतली असेल तर पंतप्रधान कार्यालयानं या प्रकरणात स्पष्टीकरण द्यावं, असं संजय राऊत म्हणालेत. भाजपा आणि संघाचे हे गुलाम झालेले नेते आहेत, त्यांचा अजेंडा हे नेते चालवत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. आम्हाला कुणालाही भेटण्याची गरज नसल्याचं राऊत म्हणालेत.
हा तर मोतीतलावचा डोमकावळा –राऊत
दीपक केसरकर यांची ताकद आहे का, असा प्रतिप्रश्न राऊतांनी केलाय. त्यांच्या दंडाच्या बेडकुळ्याही निघत नाहीत, अशी बोचरी टीका राऊतांनी केलीय. सावतंवाडीत निवडणुकीला उभं राहून दाखवा, असं आव्हानही राऊतांनी दिलंय.
हेही वाचाःमुंबईतील सहापैकी पाच जागा भाजपा लढणार?, कोणती एक जागा शिंदे शिवसेनेला?