मुंबई- सांगली लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हमून ओळखला जातो. मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपात कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय झाल्यानं सांगली मतदारसंघ हा ठाकरे शिवसेनेकडे जाणार असल्याचं सांगण्यात येतंय. याला स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध केलाय. त्यामुळं महाविकास आघाडीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. आता ही जागा काँग्रेस लढवणार की ठाकरे शिवसेना हे पहावं लागणार आहे.
विशाल पाटील की चंद्रहार पाटील?
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी काँग्रेस उमेदवार म्हणून काही महिन्यांपूर्वीपासून प्रचार सुरु केलाय. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम हेही त्यांच्यासोबत आहेत. मात्र मविआनं हा मतदारसंघ ठाकरेंना सोडल्याची चर्चा रंगल्यानंतर, कदमांनी या निर्णयाला विरोध केलेला आहे. तर डबल महाराष्ट्र केसेरी चंद्रहार पाटील हेही या मतदारसंघातून इच्छुक ाहेत. जागा ठाकरेंना जाणार याची चर्चा सुरु झाल्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतलीय. वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचाही चंद्रहारक पाटील यांना पाठिंबा आहे. त्यामुळं आका विशाल पाटील की चंद्रहार पाटील याचा निर्णय मविआला करावा लागणार आहे.
संजयकाका पाटील यांना हॅट्रिकची संधी
भाजपाचे संजयकाका पाटील या मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेले आहेत. याहीवेळी त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. जयंत पाटील, विश्वजीत कदम, विशाल पाटील या मविआच्या भक्कम फळीविरोधात संजय काका पाटील यांच्यासमोर आव्हान मानण्यात येतंय. मात्र मविआत सुरु झालेला हा वाद आता त्यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.
राजू शेट्टींची स्वाभिमानीही मैदानात
तर याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंही जाहीर केलेला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. त्यामुळं खराडेंनीही प्रचाराला सुरुवात केलीय.
चंद्रहार पाटील माघार घेण्याची शक्यता कमी आहे, तसचं विशाल पाटीलही त्यांच्या उमेदवारीवर ठाम राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत या मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येतेय.