कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त
मुंबई: कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने (ED) जप्त केला आहे. या कारवाईमुळे शरद पवार व रोहित पवार यांना लोकसभेपूर्वी मोठा धक्का बसला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कन्नड सहकारी साखर कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून बेकायदेशीरपणे 50.20 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आल्याचा कथित आरोप त्यांच्यावर आहे. बेकायदेशीर विक्रीशी संबंधित प्रकरणात कारखान्याची कन्नड येथील 161.30 एकर जमीन, प्लांट आणि यंत्रसामग्री आणि साखर कारखान्याची इमारत इत्यादी जप्त करण्यात आले आहे.
प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग (पीएमएलए), २००२ कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी केलेल्या कारवाईची माहिती घेत ईडीने प्राथमिक तपासाला सुरुवात केली. तसेच मुंबई हायकोर्टाने या प्रकरणी 2019 मध्ये दिलेल्या निकालाचादेखील अभ्यास करण्यात आला. या प्रकरणी मनी लाँन्ड्रींगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता ईडीकडून सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, माझ्या कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला, आता भाजपामध्ये (BJP) जायला पाहिजे का? पण, झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू, माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत. या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.